तळोजा आग दुर्घटना : वरिष्ठांच्या हलगर्जीमुळे जवानाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 06:46 AM2020-12-09T06:46:20+5:302020-12-09T06:47:25+5:30
Taloja fire accident: तळोजा येथे घडलेल्या आगीच्या घटनेत जवानाचा मृत्यू वरिष्ठांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे दिसून येत आहे.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : तळोजा येथे घडलेल्या आगीच्या घटनेत जवानाचा मृत्यू वरिष्ठांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे दिसून येत आहे. अग्निशमन जवान बाळू देशमुख यांना वायुबाधा झालेली असतानाही तत्काळ रुग्णालयात पाठवले नाही. त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
तळोजा एमआयडीसीमधील मोदी फार्मा या कंपनीत शुक्रवारी मध्यरात्री आग लागली होती. आग अधिक मोठी असल्याने ती विझवण्यासाठी तळोजा एमआयडीसीसह रबाळे एमआयडीसी, नवी मुंबई महापालिका तसेच अंबरनाथ एमआयडीसी यांचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. आग विझवत असताना अंबरनाथ अग्निशमन दलाचे जवान बाळू देशमुख यांना चक्कर आली. कंपनीतील क्लोरीन व बेन्झीन जळाल्याने त्यापासून तयार झालेल्या विषारी वायूमुळे त्यांना बाधा झाली होती.
विशेष म्हणजे त्यांनी दिवसपाळी केलेली असतानाही रात्रपाळीच्या कॉलवर पाठवण्यात आले होते. तसेच बाधा झाल्यानंतर तत्काळ रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. परंतु देशमुख यांना अग्निशमन गाडीतच विश्रांतीसाठी झोपविण्यात आले. बेशुद्ध अवस्थेत उलटी झाल्यावरही वेळेवर
उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. बचावकार्यावेळी अंबरनाथ अग्निशमन केंद्राचे निर्णयक्षम अधिकारी तेथे असणे आवश्यक होते. मात्र ते घटनास्थळी नसल्याने देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय होऊ शकला नाही. परिणामी त्यांच्या मृत्यूला संबंधित अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप भाऊ उत्तम देशमुख यांनी केला आहे.
शहिदाचा मान डावलला
देशमुख यांचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्याने त्यांना शहिदाचा मान मिळणे आवश्यक आहे. परंतु एमआयडीसी अग्निशमन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या अंत्यविधीकडे पाठ फिरवली. अंबरनाथ अग्निशमन केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत केवळ सलामी देण्यात आली.
घटनास्थळी अंबरनाथच्या जवानांसोबत वरिष्ठ अधिकारी नव्हते. मी स्वतः कॉल लीड करत कंपनीच्या आतमध्ये होतो. यादरम्यान देशमुख यांना बाधा झाल्याने गाडीत झोपले होते. काही वेळाने त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने रुग्णालयात पाठवले.
- दीपक गांगुर्डे, अग्निशमन अधिकारी, तळोजा