तळोजातील सांडपाण्यामुळे किनारपट्टीवरील मासेमारी धोक्यात
By नारायण जाधव | Published: July 4, 2024 03:23 PM2024-07-04T15:23:56+5:302024-07-04T15:24:32+5:30
ही वाहिनी खारघरपर्यंत आली असून ती संपूर्ण दिवाळे, ठाणे, बेलापूर, न्हावा मोरवे, उरण या मार्गाने जात असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
नवी मुंबई : तळोजा एमआयडीसीतील रासायनिक कंपन्याचे सांडपाणी समुद्रात सोडण्यासाठी भूमिगत वाहिनीचे काम सुरू आहे. ही वाहिनी खारघरपर्यंत आली असून ती संपूर्ण दिवाळे, ठाणे, बेलापूर, न्हावा मोरवे, उरण या मार्गाने जात असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
मात्र, या वाहिनीमधून सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे जलप्रदूषण होऊन मासे नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळे - बेलापूर येथील स्थानिक कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. याच अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पाॅइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे हे सांडपाणी शुद्ध करून इतरत्र सोडण्याची मागणी केली.
तळोजातील कंपन्यांचे सांडपाणी हे समुद्रात सोडले तर संपूर्ण कोकण किनारपट्टीतील मासेमारी ही धोक्यात येणार आहे. ज्या कंपनीचे पाइपलाइनचे काम चालू त्या कंपनीला त्वरित त्याचे शुद्धीकरण करून इतरत्र सोडण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी म्हात्रे यांनी विधिमंडळात केली.
कंपनी प्रतिनिधींसोबत लवकरच बैठक
मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी याबाबत तळोजातील सर्व संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत व विधिमंडळातील सदस्यांची बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावून कोकण किनारपट्टीतील कोळी बांधवांना योग्य तो न्याय देण्यात येईल, असे आश्वासन दिले.