१५ ते १९ मार्चदरम्यान नवी मुंबईत तमाशा महोत्सव, तमाशाप्रेमींना मोफत प्रवेश
By नारायण जाधव | Published: March 14, 2023 04:37 PM2023-03-14T16:37:03+5:302023-03-14T16:37:41+5:30
यंदा वाशी सेक्टर-१ ए मधील नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा संकुलात संध्याकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेत रंगणार आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने १५ मार्च ते १९ मार्चदरम्यान वाशी येथे तमाशा महोत्सव आयोजित केला आहे. कोरोना काळानंतर शासनाचा हा तमाशा महोत्सव होत आहे. महोत्सवात तमाशाप्रेमींना मोफत प्रवेश असल्याने त्याचा लाभ घ्यावा, असे शासनाने कळविले आहे.
यंदा वाशी सेक्टर-१ ए मधील नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडा संकुलात संध्याकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेत रंगणार आहे.
असा आहे तमाशांचा कार्यक्रम -
याअंतर्गत १५ मार्च रोजी तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजवाडीकर, १६ मार्च रोजी अंजलीराजे नाशिककर, १७ मार्च रोजी भीमा नामा अंजाळेकर, १८ मार्चला लता-लंका पाचेगांवकर आणि १९ मार्च विठा भाऊ मांग नारायणगांवकर, लोकनाट्य मंडळ तमाशा सादर करणार आहेत.
म्हणून महोत्सवासाठी नवी मुंबईची निवड -
महाराष्ट्रात तमाशा लोककला सर्वत्र लोकप्रिय असली तरी तिची क्रेझ पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगलीसह ज्या सोलापूर आणि कोल्हापुरात आहे, त्या भागातील रहिवाशांची नवी मुंबईत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे मोठी आहे. त्यामुळे दरवर्षी येथे महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग तमाशा महोत्सव आयोजित करतो. राज्यभरातील लोककलावंत नवी मुंबईत येत आहेत, त्यांना आधार द्या, सन्मान करा. लोककला ही आपली ओळख आहे, तिला जपा, असे आवाहन तमाशाप्रेमींनी केले आहे.
विठाबाई नारायणगाव पुरस्काराचे वितरण
यंदाच्या तमाशा महोत्सवात शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगाव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यात २०१८-१९ साठी गुलाबबाई संगमनेकर, २०१९-२० साठी अतांबर शिरढोणकर आणि २०२०-२१ साठी संध्या रमेश माने या दिग्गजांना हे पुरस्कार १६ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता देण्यात येणार आहे. कोविडमुळे दोन वर्षे महोत्सव न झाल्याने त्या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरणही यंदा करण्यात येत आहे.
यांची आहे उपस्थिती
कार्यक्रमासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार राजन विचारे आणि आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे आणि संचालक विभिषण चवरे उपस्थित राहणार आहेत.