टँकरचालकाने दाम्पत्यासह १० वर्षीय मुलाला चिरडले; जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 06:58 IST2025-03-16T06:58:15+5:302025-03-16T06:58:32+5:30
अपघातानंतर टँकरचालकाने पळ काढला होता, मात्र पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला अटक केली.

टँकरचालकाने दाम्पत्यासह १० वर्षीय मुलाला चिरडले; जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात
नवीन पनवेल : चालकाने बेदरकारपणे टँकर चालवल्याने दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यासह त्यांच्या दहा वर्षांच्या मुलाचा टँकरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. हा अपघात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील कोनगाव येथे शुक्रवारी रात्री उशिरा घडला. अपघातानंतर टँकरचालकाने पळ काढला होता, मात्र पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला अटक केली.
शोभित सतीश सालुजा (४१), जुई शोभित सालुजा (३२) आणि लाडो (१०) (सर्व रा. सेक्टर १८, कामोठे) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. शोभित सालुजा हे पत्नी आणि मुलगा यांच्यासह खोपोलीहून पनवेलकडे दुचाकीवरून येत होते. त्यांची दुचाकी गोल्डन नाइट बारसमोरील कोनगावजवळ आली असता समोरून आलेल्या टँकरने अचानक वळण घेतले. त्याबरोबर टँकरची दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील तिघेही टँकरच्या चाकाखाली आले. अपघातानंतर टँकरचालक घाबरून पळून गेला होता.
चालकाला अटक
अपघाताची माहिती मिळताच पनवेल पोलिसांचे पथक अपघातस्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी टँकरचालक गहिनीनाथ कुंडलिक गर्जे (रा. आष्टी, बीड) याचा शोध घेऊन त्याला अटक केली. एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि मुलगा यांचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.