टँकर लॉबीला ‘अच्छे दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 04:26 AM2018-05-03T04:26:00+5:302018-05-03T04:26:00+5:30
पनवेल शहर व ग्रामीण भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
मयूर तांबडे
पनवेल : पनवेल शहर व ग्रामीण भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महापालिकेवर मोर्चे, उपोषण करूनदेखील पाण्याचा प्रश्न सुटत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई टँकर लॉबीच्या पथ्यावर पडली आहे. टँकरच्या पाण्याला मागणी वाढल्याने आवाच्या सव्वा दरात पाणी विकले जात आहे. एकूणच पनवेलमधील पाणीटंचाईमुळे येथील टँकर लॉबीला मात्र अच्छे दिन आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
एकीकडे टँकरमुक्त महाराष्ट्राची स्वप्ने सरकार दाखवत असताना, पनवेलसारख्या शहरात गेली अनेक वर्षे उन्हाळ्यात पाण्याच्या तुटवड्यामुळे खासगी टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ दरवर्षी येते. पुरविण्यात येणारे पाणी सोसायट्यांना अपुरे पडत असल्याने अनेक सोसायट्यांकडून खासगी टँकरची मागणी केली जाते. मात्र, याच मागणीचा गैरफायदा टँकरचालक-मालक घेऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, मागील दीड-दोन महिन्यांत शहरातील पाणीप्रश्न अधिक गंभीर बनला आहे. त्यामुळे टँकरच्या पाण्याला मागणी वाढली आहे. याचा नेमका फायदा टँकरचालकांनी घेतला आहे. सध्या एक टँकर पाण्यासाठी १५०० ते दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत. काही मोठ्या सोसायट्यांमध्ये तर दिवसाला तीन ते चार टँकरने पाणी लागते. नाइलाजास्तव सोसायट्यांना पाण्यासाठी हा खर्च करावा लागत आहे. खासगी टँकरच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या शुद्धतेविषयी खात्री नसल्याने हे पाणी दूषित असल्याच्या तक्र ारी पुढे येत आहेत. हा पाणीपुरवठा म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला जात आहे. ऐन उन्हाळ्यात शहरी आणि ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फायदा घेऊन टँकर लॉबीने नागरिकांची लूट चालविल्याचा आरोप होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना तर हंडाभर पाण्यासाठीही वणवण करावी लागत आहे. यासंदर्भात महापालिकेकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सोसायट्यांमधील रहिवासी टँकरच्या पाण्यावर जगत आहेत. काही सोसायट्यांतील रहिवासी पिण्याबरोबरच स्वच्छतागृहातही बंद बाटलीतील बिस्लरी पाण्याचा वापर करताना दिसत आहेत. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रात बिस्लरी पाण्याच्या बाटल्यांनाही चांगली मागणी वाढल्याचे दिसून आले आहे.