तिकिटातून उलगडला ‘टपाल’ इतिहास

By Admin | Published: December 2, 2015 12:53 AM2015-12-02T00:53:03+5:302015-12-02T00:53:03+5:30

भारतीय टपाल सेवेचा इतिहास उलगडणारे प्रदर्शन नेरूळमध्ये सुरू झाले आहे. जगातील सर्वात मोठी टपाल व्यवस्था म्हणून ओळख असणाऱ्या पोस्टाची २५१ वर्षांतील

'Tappal' history unraveled from the ticket | तिकिटातून उलगडला ‘टपाल’ इतिहास

तिकिटातून उलगडला ‘टपाल’ इतिहास

googlenewsNext

नवी मुंबई : भारतीय टपाल सेवेचा इतिहास उलगडणारे प्रदर्शन नेरूळमध्ये सुरू झाले आहे. जगातील सर्वात मोठी टपाल व्यवस्था म्हणून ओळख असणाऱ्या पोस्टाची २५१ वर्षांतील वाटचाल या प्रदर्शनामधून पहावयास मिळत आहे. भारतीय इतिहास, संस्कृतीचे दर्शन घडविणारी टपाल तिकिटे पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी करण्यास सुरवात केली आहे.
स्पर्धेच्या युगामध्ये पोस्ट सेवा कालबाह्य झाली असल्याचे मानले जात आहे. शहरांमधून पोस्टऐवजी कुरिअर सेवेला प्राधान्य मिळू लागले आहे. असे असले तरी आजही जगातील सर्वात मोठी टपाल यंत्रणा म्हणून भारतीय टपाल सेवेचे स्थान अबाधित आहे. देशात १ लाख ५५ हजार टपाल कार्यालये आहेत. प्रत्येक खेड्यापर्यंत पत्र व इतर सुविधा पुरविल्या जात आहेत.
पोस्टाचा इतिहास प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचविण्यासाठी व कुरिअरच्या जमान्यातही नागरिकांना पोस्ट सुविधेकडे वळविण्यासाठी नवी मुंबईत नेरूळमधील आगरी कोळी भवनमध्ये स्टँप फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. इंग्रजांनी त्यांच्या सुविधेसाठी १७६४ मध्ये पहिल्यांदा टपाल सेवा सुरू केली. १८५४ मध्ये टपाल सेवा सर्व नागरिकांसाठी खुली करण्यात आली. तेव्हा राणी एलिझाबेथचे चित्र असणारे टपाल तिकीट प्रसिद्ध करण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्ते, खेळ, पक्षी, रेल्वे, कला, संस्कृतीचे दर्शन घडविणारी टपाल तिकिटे तयार करण्यात आली आहेत. आता तर प्रत्येक नागरिकाला स्वत:चा फोटो असणारे टपाल तिकीट तयार करण्याची सुविधाही निर्माण झाली असून सर्व टपाल तिकिटे या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहेत.
आगरी कोळी भवनमध्ये सुरू असणारे हे प्रदर्शन २ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. पहिल्याच दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती. पुणे विद्याभवन व इतर शाळेमधील विद्यार्थीही प्रदर्शन पाहण्यासाठी आले होते. याठिकाणी विद्यार्थ्यांना पोस्टाच्या टपाल तिकिटांची व टपाल सेवेचा इतिहास माहिती व्हावा यासाठी प्रश्नमंजूषेचा कार्यक्रम आयोजित केला होता. लघुपटाच्या माध्यमातूनही माहिती देण्यात आली. प्रदर्शनामध्ये भारतामधील नाणी व इतर महत्त्वाच्या घडामोडींवर आधारित स्टँप पहावयास मिळत आहेत.
मंगळवारी राज्याचे मुख्य पोस्ट मास्तर ए. के. दाश यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

शोध पहिल्या टपाल तिकिटाचा
देशात टपाल सेवा सुरू केल्यानंतर इंग्रजांनी १८५४ मध्ये राणी एलिझाबेथचे चित्र असणारे पहिले टपाल तिकीट प्रकाशित केले. पहिल्या टपाल तिकिटामधील एक तिकीट इंग्लंडच्या संग्रहालयामध्ये आहे. एक मुंबईतील व्यक्तीकडे व दुसरे नवी मुंबईमधील एका नागरिकाकडे आहे.
नवी मुंबईतील व्यक्तीचा पत्ता टपाल कर्मचाऱ्यांकडेही नाही. या दुर्मीळ तिकिटाची किंमत आता एक कोटी रूपये आहे. हा ऐतिहासिक दस्तावेज काही प्रदर्शनामध्ये संबंधित नागरिकांनी पाहण्यासाठी उपलब्ध केला होता. नवी मुंबईत होणाऱ्या प्रदर्शनामध्येही संबंधित व्यक्तींनी ते उपलब्ध करून द्यावे असे आवाहन पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी केले आहे.

Web Title: 'Tappal' history unraveled from the ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.