मार्केटमधील टारझनचा गांजा अड्डा पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 02:30 AM2017-12-09T02:30:03+5:302017-12-09T02:30:15+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील टारझनचा गांजा अड्डा दीड वर्षानंतर पुन्हा सुरू झाला आहे. २४ तास गांजाविक्री करण्यासाठी कमिशनवर मुले नेमण्यात आली आहेत.

Tarazan ganja resumes in the market again | मार्केटमधील टारझनचा गांजा अड्डा पुन्हा सुरू

मार्केटमधील टारझनचा गांजा अड्डा पुन्हा सुरू

Next

नामदेव मोरे
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील टारझनचा गांजा अड्डा दीड वर्षानंतर पुन्हा सुरू झाला आहे. २४ तास गांजाविक्री करण्यासाठी कमिशनवर मुले नेमण्यात आली आहेत. बिनधास्तपणे अमली पदार्थांची विक्री सुरू असताना बाजारसमिती प्रशासन व पोलीसही काहीच कारवाई करत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईमधील भाजी मार्केट नवी मुंबईमध्ये स्थलांतर केल्यानंतर टारझन उर्फ हरिभाऊ विधाते याने या परिसरात अमली पदार्थ विक्रीचा अड्डा तयार केला होता. मार्केटच्या शेवटच्या गेटजवळील पानटपरी व बाहेरील महापालिकेचे सार्वजनिक प्रसाधनगृह येथे हा अड्डा सुरू होता. येथे गांजा विकणाºया मुलांची साखळी तयार करण्यात आली होती. २४ तास कधीही गांजा उपलब्ध करून दिला जात होता. जुलै ते आॅक्टोबर २०१६मध्ये ‘लोकमत’ने केलेल्या दोन स्टिंग आॅपरेशननंतर एपीएमसी पोलिसांनी व नंतर अमली पदार्थविरोधी पथकाने टारझनवर गुन्हा दाखल केला. त्याला तुरुंगात पाठविले होते. एक वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिलेला टारझन काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटून आला आहे. तो तुरुंगातून बाहेर आल्यानंतर येथील गांजा अड्डा पुन्हा सुरू झाला आहे. हा अड्डा टारझनच्या आशीर्वादानेच सुरू असल्याची चर्चा मार्केटमध्ये आहे; परंतु अद्याप त्या पाठीमागे कोण आहे? हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. ‘लोकमत’च्या टीमने दोन दिवस या परिसरामध्ये स्टिंग आॅपरेशन केले. भाजी मार्केटमधील प्रसाधनगृहाला लागून बसलेले चार ते पाच तरुण बिनधास्तपणे गांजा ओढत होते. येथील उभ्या वाहनांमध्ये व हातगाड्यांवर बसून येणाºया ग्राहकांना १०० रुपयांमध्ये गांजाची पुडी दिली जात असल्याचे निदर्शनास आले.
बाजारसमितीच्या गेटवरच अमली पदार्थांची विक्री सुरू असताना येथील सुरक्षा अधिकारी व कर्मचाºयांनी अद्याप काहीही आक्षेप घेतलेले नाहीत. पोलिसांची बिट मार्शल व इतर गस्ती वाहनेही मार्केटमध्ये दिवसरात्र पहारा ठेवत असतात; पण सर्वांना माहीत असलेला अड्डा पोलिसांना अजून का माहीत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बाजारसमितीमध्ये अनधिकृतपणे मुक्काम करत असलेले कामगार अमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. याशिवाय महाविद्यालयीन तरुणही येथे गांजाखरेदी करण्यासाठी येत आहेत. गतवर्षी दोन वेळा पोलिसांनी कारवाई केली असल्यामुळे आता विक्रेत्यांनी सावधानता बाळगली आहे. अनोळखी व्यक्तीला गांजा विकत दिला जात नाही. गांजा अड्ड्याच्या परिसरामध्ये जास्त वेळ कोणी थांबले तरी त्याची विचारपूस केली जात आहे. या परिसराचे फोटो काढणाºयांनाही तत्काळ अडविले जात असून फोटो का काढले? याविषयी जाब विचारण्यात येत आहे.

कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर
एपीएमसीमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाºयांना व अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्यांना अभय दिले जात आहे. येथील प्रसाधनगृह व इतर ठिकाणी अमली पदार्थांची साठवणूक केली जात आहे. वेळेत गुन्हेगारांवर कारवाई केली नाही तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बेकायदेशीर वास्तव्य
बाजारसमितीमध्ये अनुज्ञप्ती नसलेल्या कोणालाही काम करता येत नाही व येथे थांबताही येत नाही; परंतु गांजाविक्रेते सर्व नियम धाब्यावर बसवून मार्केटमध्ये दिवस- रात्र बिनधास्तपणे वावरत आहेत. सर्वांसमोर गांजा ओढत असतात व विक्रीही करत असतात. हा बेकायदेशीर व्यवसाय थांबविण्यासाठी प्रशासन काहीही करत नसल्यामुळे व्यापारी व इतर घटकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Tarazan ganja resumes in the market again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.