प्राची सोनवणे, नवी मुंबईनागरिकांच्या संरक्षणासाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या पोलिसांचे स्वत:चे कुटुंब मात्र असुरक्षित आहे. सीबीडी सेक्टर एक परिसरातील पोलीस वसाहतींची झालेली दयनीय अवस्था पाहता त्यांच्या कुटुंबीयांवर टांगती तलवार आहे. घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत, दारे-खिडक्या मोडकळीस आल्या आहेत, काही घरांच्या लोखंडी पिलरच्या सळ््या बाहेर आल्या आहेत, अनेक घरांचे प्लास्टर निखळले आहे.पोलीस वसाहतीमध्ये २४४ बैठी घरे आहेत तर चार इमारतींमध्ये ६० हून अधिक घरे आहेत. २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या सर्वच घरांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. दिवस-रात्र डोळ््यात तेल घालून नागरीसुरक्षेसाठी लढणाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र सुटता सुटत नाही. इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी अनेकदा आपल्या समस्या मांडण्यासाठी मोर्चे काढले, नेतेमंडळींची भेट घेतली तरीही अपयशच आले. या घरांची बांधणीच मुळात निकृष्ट दर्जाची आहे, अशी तक्रार इथल्या नागरिकांनी केली. इमारतीचे बांधकामच मुळात निकृष्ट दर्जाचे आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. घरांच्या या अवस्थेसंबंधी तक्रार केली की त्याचा वाईट परिणाम नोकरीवर होतो. अधिकारी वर्गाकडून या पोलीस कर्मचाऱ्यांना धाक दाखविला जातो. घरांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी केलेली तक्रार त्यांच्याच अंगाशी येते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. --------------घरांसाठी वणवण पोलिसांच्या तटपुंज्या पगारावर कुटुंबीयांच्या गरजा भागविताना नाकीनऊ येतात. पगार कमी असल्याने गृहकर्जही मिळत नाही. वाढत्या मालमत्ता दरामुळे भाड्याने घर घेऊन राहणेही परवडत नसल्याची तक्रार या रहिवाशांनी केली. नाईलाजास्तव या पोलीस वसाहतीत राहणे भाग पडत असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस वसाहतीला ताडपत्रीचा आधार
By admin | Published: July 10, 2015 3:14 AM