नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मलावी देशातील हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. शनिवारी ५९८ बाॅक्सची आवक झाली असून १० ते १५ आंब्यांच्या एका बाॅक्सला ४५०० ते ५५०० रुपये भाव मिळत आहे.
फळांच्या राजाची गोडी जगभरातील अनेक देशांतील नागरिकांना आवडू लागली आहे. भारतामधून अनेक देशांमध्ये आंब्याची निर्यात होते; पण आता इतर देशांमध्येही आंबा लागवड सुरू झाली आहे. पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातही आंबा लागवड केली जात आहे. प्रत्येक वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये मलावी हापूस विक्रीसाठी भारतात येतो.
यावर्षी शनिवारी आंब्याची आवक झाली. पहिल्या दिवशी ५९८ बाॅक्स आले आहेत. बाॅक्समध्ये १० ते १६ आंबे आहेत. प्रथेप्रमाणे पहिल्या बाॅक्सचे पूजन करण्यात आले. यावर्षी नोव्हेंबरमध्येच कोकण, केरळसह विदेशातून आवक सुरू झाल्याने मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोकणातून नेली रोपे मलावी देशातील हवामान कोकणाप्रमाणे आहे. २०११ मध्ये तेथील शेतकऱ्यांनी कोकणातून हापूसची रोपे नेली. तेथे ४०० एकरांवर आंबा बाग तयार केली आहे. प्रत्येक वर्षी नोव्हेंबरमध्ये येथील आंबा विक्रीसाठी विविध देशांत पाठविला जातो.
मलावी देशातील हापूस आंब्याची आवक सुरू झाली आहे. २० नोव्हेंबरपासून आवक वाढेल. डिसेंबरपर्यंत हंगाम सुरू राहील.- संजय पानसरे, संचालक, फळ मार्केट