लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई :टाटा रिॲलिटीच्या ‘इंटेलियन’ आयटी पार्कचे भूमिपूजन शनिवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे राज्यात ५००० कोटी रुपयांची थेट गुंतवणूक येणार असून सुमारे ७० हजार जणांना नोकरीची संधी मिळेल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.यावेळी टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे एमडी आणि सीईओ संजय दत्त, अशोक सुभेदार, ॲक्टिस इंडियाचे भागिदार आशिष सिंग, बिझनेस हेड अभिजीत माहेश्वरी, एमआयडीसीचे सीईओ डॉ. पी. अन्बलगन उपस्थित होते.
राज्य शासनाने उद्योग वाढीसाठी विविध धोरणे आखली. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आयटी, आयटीएस धोरणामुळे राज्यात सर्वाधिक डेटा सेंटर्स सुरू झाली आहेत. येत्या काही दिवसांत हे प्रमाण ८० टक्क्यांवर जाईल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. राज्यात गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. गुंतवणूक वाढवण्यासाठी आम्ही इतर राज्यात जात नाही. दुबई, युरोपसारख्या देशांत जातो. कोरोनाकाळात आम्ही सुमारे दोन लाख कोटींची गुंतवणूक आकर्षित केली, असेही ते म्हणाले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.