पहिल्याच चौकशीला तटकरे अनुपस्थित
By Admin | Published: August 18, 2015 01:48 AM2015-08-18T01:48:52+5:302015-08-18T01:48:52+5:30
राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार व सुनील तटकरे यांच्या कथित सहभागाबाबत खुल्या चौकशीचे आदेश फडणवीस
ठाणे : राज्यातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार व सुनील तटकरे यांच्या कथित सहभागाबाबत खुल्या चौकशीचे आदेश फडणवीस सरकारने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत. त्यानुसार तटकरे यांना सोमवारी चौकशीसाठी पाचारण केले होते. परंतु ते या चौकशीला अनुपस्थित राहिले. तर पुढील आठवड्यात अजित पवार यांचीही चौकशी होऊ शकते. तसेच तटकरेंनाही पुन्हा बोलवले जाऊ शकते, अशी माहिती एसीबीच्या सूत्रांनी दिली आहे.
देशातील प्रमुख घोटाळ्यांपैकी एक ओळखल्या जाणाऱ्या सिंचन घोटाळ्याची चौकशी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवण्याचे आदेश फडणवीस सरकारने आठ महिन्यांपूर्वी दिले होते. यानुसार, ठाणे लाचलुचपत विभागाने सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरू केली असून या प्रकरणाशी संबंधित सुमारे ९० हजारांहून अधिक दस्तावेज आपल्या ताब्यात घेतले आहेत. मात्र, ७० हजार कोटींच्या घरात व्याप्ती असलेल्या या घोटाळ्याच्या चौकशीसाठी फक्त तीनच जणांची चौकशी समिती गठीत केली आहे. दरम्यान, सिंचन घोटाळ्याप्रकरणी सुरू असलेल्या १२ धरणांपैकी तीन धरणांचा सीलबंद प्रगती अहवाल ठाणे लाचलुचपत विभागाने मुंबई उच्च न्यायालयात जून महिन्यात सादर केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आता या प्रकरणातील काही आणखी दस्तावेज प्राप्त झाल्याची माहिती ठाणे एसीबीच्या सूत्रांनी दिली.