सलग १५व्या वर्षी नवी मुंबईकरांना कर दिलासा; कोणतीही दरवाढ नाही
By योगेश पिंगळे | Published: February 20, 2024 06:52 PM2024-02-20T18:52:27+5:302024-02-20T18:52:44+5:30
कोणतीही करवाढ नाही : ४,९५० कोटींचा अर्थसंकल्प सादर
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सलग १५व्या वर्षी नवी मुंबईकरांना कोणतीही करवाढ नसलेला २०२४-२५चा ४ हजार ९५० कोटी रुपयांचा मूळ अर्थसंकल्प नवी मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर यांनी मंगळवारी सादर केला. करवाढ नसल्याने नवी मुंबईकरांना यंदाही मोठा दिलासा मिळाला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य, शिक्षणास प्राधान्यक्रम देतानाच स्वच्छता, पर्यावरण, वाहतूक सुविधा, लोककल्याणकारी योजनांवर भर दिला असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले. सलग १५ वर्षे सातत्याने नवी मुंबईकरांवर कोणतीही करवाढ लादलेली नाही.
महापालिका आयुक्तांनी २०२४-२५ मध्ये १३७७.६८ कोटी आरंभीच्या शिल्लकेस २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ४,९५० कोटी रुपये जमा, तर ४९४७.३० कोटी रुपये खर्चासह २ कोटी ७० लाख रुपये शिलकीचा नवी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेची आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासह महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा कौशल्यपूर्ण गुणवत्ता विकास, अग्निशमन विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विदेशी बनावटीच्या वाहनांची खरेदी, दिव्यांगांचे सक्षमीकरण, महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक, मागासवर्गीय घटक, आर्थिक दुर्बल घटक यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यावर भर दिला असल्याचे नार्वेकर यांनी यावेळी सांगितले.
कोपरखैरणे येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधणे, परिवहन बसस्थानकांचा विकास करणे, घणसोली - ऐरोली खाडीपूल व रस्ता बांधणे, पार्किंग, विद्युत मलनिःसारणविषयक कामे करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.
वाहतूक सुधारणार : वाहतूककोंडी टाळण्यासाठी पामबीच मार्गावर वाशी सेक्टर १७ येथे २९० मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. शहरातील चार ठिकाणच्या कल्व्हर्ट पुनर्बांधणी, दुरुस्ती आणि सुधारणा करण्यात येणार आहेत. महापे उड्डाणपुलावरून ठाणे बेलापूर रस्त्यावर जाण्यासाठी आर्म बांधण्यात येणार आहे. तुर्भे पुलाला फायझर कंपनीकडील रस्त्याला जोडण्यासाठी ठाणे - बेलापूर रस्त्यावरून सायन - पनवेल ब्रिजवर आर्म उभारण्यात येणार आहे.
नवीन जलस्रोत : नवी मुंबईतील लोकसंख्या वाढीचा दर विचारात घेऊन सन २०५५ पर्यंत या शहराला सुमारे ९५० द. ल. लि. दैनंदिन पाण्याची आवश्यकता लागणार आहे. याकरिता शहरासाठी भीरा जलविद्युत प्रकल्पातून विद्युत निर्मितीनंतर विसर्ग केलेले पाणी घेणे, पावसाळा कालावधीत पाताळगंगा नदीतील पाणी उचलणे, भीरा धरणातून कुंडलिका नदीचे टेलरेस पाणी मिळविणे, अशा जलस्रोतांबाबतच्या विविध पर्यायांचा विचार केला असून, शासनाकडे पत्रव्यवहार सुरू आहे.
कचरा वाहतुकीचे आधुनिकीकरण : नव्याने काढण्यात येणाऱ्या कचरा वाहतुकीच्या निविदेमध्ये सद्यस्थितीत असलेल्या वाहनांव्यतिरिक्त नवीन १०० वाहनांची वाढ नियोजित असून, त्यामधील ४० वाहने बॅटरी ऑपरेटेड असतील.
संगीत शिक्षण : विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी प्रायोगिकतत्त्वावर आधुनिक सुविधांसह संगीत, वादन, गायन शिकविण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.
सौरउर्जा व जलविद्युत प्रकल्प : मोरबे धरणावर १०० मेगावॅट क्षमतेचा व १.५ मेगावॅट जलविद्युत प्रकल्प उभारण्याचे नियोजन असून, या प्रकल्पाला फेरमान्यता घेण्यात आली आहे. सदर प्रकल्प पूर्ण झाल्यावर महापालिकेच्या वीजबिलात ५० कोटी रुपयांची बचत होणार आहे.