नवी मुंबई : शहरातील ७५० चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. याशिवाय एपीएमसीमधील घनकचरा प्रकल्पाकरिता जागा उपलब्ध करून द्यावी. झोपडपट्टी व इतर ठिकाणचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे.राष्ट्रवादी काँगे्रसने ५०० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या निवासी मालमत्तांना कर माफ करण्याचा प्रस्ताव मांडण्याची घोषणा केली आहे. शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंगळवारी आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांची भेट घेतली व ७५० चौरस फूट क्षेत्रफळापर्यंतच्या घरांना कर माफ करण्याची मागणी केली आहे. एपीएमसीमधील घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्पाकरिता जागा उपलब्ध करून द्यावी. वसाहतीअंतर्गत मलनि:सारण वाहिन्या बदलण्याची कामे महापालिकेच्या माध्यमातून करण्यात यावीत. शहर विकास आराखड्यास तत्काळ मंजुरी दिली जावी अशीही मागणी केली.एपीएमसीमधील व्यापाऱ्यांना गोदामासाठी दिलेल्या भूखंडावर परस्पर इतर वापरासाठीचे बांधकाम सुरू आहे. याची चौकशी करण्यात यावी. शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडविण्यात यावा अशी मागणीही केली.यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्यासोबत जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, दिलीप घोडेकर, प्रकाश पाटील, मिलिंद सूर्याराव, रोहिदास पाटील, विजय माने, प्रवीण म्हात्रे, नगरसेवक एम. के. मढवी, रामदास पवळे, सोमनाथ वास्कर, काशिनाथ पवार, रतन मांडवे, सरोज पाटील, मेघाली राऊत, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, समीर बागवान व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
७५० चौरस फूट क्षेत्रफळांच्या घरांना करमाफी द्या, शिवसेनेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 11:56 PM