'त्या' व्हिडीओ कॉलने उद्ध्वस्त केलं शिक्षकाचं आयुष्य; अटल सेतूवर संपवलं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 16:18 IST2025-02-15T16:12:45+5:302025-02-15T16:18:58+5:30
अटल सेतूवर अलिबागमधील शिक्षकाने संपवले स्वतःचे आयुष्य

'त्या' व्हिडीओ कॉलने उद्ध्वस्त केलं शिक्षकाचं आयुष्य; अटल सेतूवर संपवलं आयुष्य
Atal Setu: नवी मंबईला जोडणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर आत्महत्यांचे सत्र थांबवण्याचे नाव घेत नाहीये. अलिबाग येथे राहणाऱ्या एका शिक्षकाने अटल सेतूवरून समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कारमधून आलेल्या या शिक्षकाने अटल सेतूवर गाडी थांबवून थेट समुद्रात उडी घेतली. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर सुरक्षा जवानांकडून शिक्षकाची शोध सुरु करण्यात आला होता. मात्र शिक्षकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आलं. या घटनेनंतर शिक्षकाच्या आत्महत्या करण्याचे कारण देखील समोर आलं आहे.
आत्महत्या केलेली व्यक्ती अलिबाग येथील कुर्डुस गावचे रहिवासी होते आणि तिथल्याच प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शिक्षक त्याच्या कारने अटल सेतूवर आला होता. त्यानंतर त्याने कार रस्त्याच्या कडेला उभी केली आणि थेट समुद्रात उडी मारली. अटल सेतूवरील सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार दिसल्यानंतर नियंत्रण कक्षाने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. उलवे पोलिसांनी आणि सागरी सुरक्षा विभागाने शिक्षकासाठी शोधमोहीम सुरू केली. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला नाही.
मोबाईल घरीच ठेवून गाठला अटल सेतू
या शिक्षकाने सकाळी ७.३० वाजताच कोणाला काही न सांगताच घर सोडलं होतं. शिक्षकाने त्याचा मोबाइलही घरातच ठेवला होता. त्यानंतर ते चिरनेरमार्गे अटल सेतूवर गेला. अटल सेतूवर ९ किमी अंतरावर शिक्षकाने गाडी थांबवली आणि पुलावरून उडी मारली. त्यामुळेते समुद्रात वाहुन गेले होते. चौकशीदरम्यान शिक्षकाने सेक्सटॉर्शनच्या अत्याचाराला कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे समोर आले. व्हिडिओ कॉलद्वारे त्याचे घाणेरडे फोटो काढून सायबर गुन्हेगारांनी त्यांना ब्लॅकमेल केले होते.
पोलिसांकडे तक्रार न करताच परतले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षकाच्या कुटुंबीयांना त्यांच्यासोबत काय घडलं याची कल्पना होती. त्यांचे दूरचे नातेवाईक पोलीस खात्यात होते. त्यांनी शिक्षकाला काळजी करू नकोस आणि पोलीस तक्रार दाखल कर असं सांगितले होते. पण समाजात बदनामी होईल या भीतीने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. पोयनाड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी ते गेले होते मात्र तक्रार न करताच परतले. यानंतर शिक्षकाने शुक्रवारी सकाळी अटल सेतूवर जात आत्महत्या केली. शिक्षकाने नवीन फोन घेतला होता, तो कारमधील सीलबंद बॉक्समध्ये सापडला. पोलिसांनी कारच्या नोंदणी क्रमांकाच्या मदतीने शिक्षकाची ओळख पटवून त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.
आरोपीकडून सुरु होता छळ
दरम्यान, शिक्षकाच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, त्याने यापूर्वीच अत्याचार करणाऱ्यांना १२ हजार आणि सहा हजार रुपये दिले होते. त्यानंतर शिक्षकाने सायबर गुन्हेगाराचा नंबर ब्लॉक केला होता. पण तरीही सायबर गुन्हेगार शिक्षकाला वेगवेगळ्या नंबरवरून पैशासाठी फोन करत होता. आरोपींकडे शिक्षकाची कॉन्टॅक्ट लिस्ट होती. आरोपी शिक्षकाच्या नावावर वेगवेगळ्या लोकांकडून पैशाची मागणी करुन त्याला ब्लॅकमेल करत होता.