एपीआर बहिष्कारावर शिक्षक संघटना ठाम
By admin | Published: October 17, 2015 02:00 AM2015-10-17T02:00:21+5:302015-10-17T02:00:21+5:30
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम नाकारणाऱ्या शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या तहसीलदारांच्या आदेशानंतरही शिक्षक त्यांच्या
उरण : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम नाकारणाऱ्या शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या तहसीलदारांच्या आदेशानंतरही शिक्षक त्यांच्या बहिष्काराच्या निर्णयावर ठाम आहेत. तहसीलदारांनी कारवाईच्या बडग्याविरोधात येथील विविध संघटना एकवटल्या आहेत. त्यामुळे तहसील, प्रशासनाविरोधात शिक्षक अशा नव्या संघर्षाला आता प्रारंभ झाला आहे.
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम येथील शिक्षकांवर सोपविण्यात आले होते. मात्र उरण येथील ६९ शिक्षकांनी एका न्यायालयीन निकालाचा आधार घेत या कामावर बहिष्कार टाकीत काम करण्यास नकार दिला होता. काम नाकारणाऱ्या शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाच्या सूचना उरण गटशिक्षण अधिकाऱ्यांना उरण तहसीलदारांनी दिल्या आहेत. मात्र तहसीलदारांच्या आदेशांना केराची टोपली दाखवित बहिष्कारावर ठाम असल्याचे पत्रकच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जिल्हा अध्यक्ष कौशिक ठाकूर, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष महेंद्र गावंड, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष बा.ना. ठाकूर यांनी काढले आहे. यासाठी त्यांनी न्यायालयाच्या एका निर्णयातील पाच मुद्यांचा आधार घेतला आहे. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम नाकारणाऱ्या शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णयावर ठाम असल्याचे उरण तहसीलदार नितीन चव्हाण यांनी सांगितले. या शिक्षकांवर कारवाईसाठी उरण गटशिक्षण अधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.