ठाणे : गेल्या काही वर्षांत शिक्षकांचे प्रश्न, समस्या वाढल्या आहेत. मात्र, त्यासाठी केवळ मोर्चे, आंदोलने करून उपयोग नाही, त्यापेक्षा सर्व शिक्षकांनी एकत्र या, परिस्थितीला सामोरे जा, लढा द्या. गरज पडली, तर मी तुम्हाला सहकार्य करीन, असा सल्ला मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांनी शिक्षकांना दिला. ठाणे आणि पालघर जिह्यातील ६४ शिक्षकांचा सांदिपनी पुरस्कार देऊन गौरव केला.कै. एन. एस. जे. शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे ‘शिक्षक सन्मान दिन’ सोहळा शुक्रवारी सायंकाळी घंटाळी मैदानाच्या पटांगणावर झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. देशमुख होत्या. त्या म्हणाल्या की, ज्ञान-विज्ञानाबरोबरच प्रज्ञान व आत्मज्ञानही असते. शिक्षक मुलांना आत्मज्ञान शिकवतात. आजचा शिक्षक हा गुरुकुलापासून सायबरकुलाकडे चालला आहे. पूर्वी आपल्याला शिक्षण घेण्यासाठी गुरूच्या घरी गुरुकुलात जावे लागत असे. आताच्या युगात गुरूही कॉम्प्युटरच्या आधारे एका क्लिकवर कशी माहिती मिळवता येते, हे शिकवतात. शिक्षणपद्धती कोणतीही असो, प्रत्येक शिक्षक मुलांना घडवतात. शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत. त्यांना आंदोलन करावे लागते. पण अशी वेळ येऊ नये. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी योग्य मार्गदर्शन करावयाला आपण सदैव सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.आज वकील, डॉक्टर, अभियंते, सीए, शिक्षक इत्यादींच्या मुलांना भविष्यात कोण होणार असे विचारले तर कोणीही शिक्षक होणार अशी इच्छा व्यक्त करत नाहीत. ही चूक शिक्षक वा विद्यार्थ्यांची नाही. याचे खरे कारण म्हणजे शिक्षकी पेशाचा हरवलेला सन्मान असे मत शिक्षकमित्र अॅड. केदार जोशी यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
शिक्षकांनो, एकत्र येऊन लढा
By admin | Published: December 26, 2016 6:57 AM