शिक्षक, पदवीधरांनी मतदार नोंदणीत सहभाग घ्यावा; कोकण विभागीय आयुक्तांचे आवाहन
By कमलाकर कांबळे | Published: September 26, 2023 07:31 PM2023-09-26T19:31:39+5:302023-09-26T19:33:41+5:30
नवीन मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर.
कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक व कोकण पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. त्यानुसार ३० सप्टेंबर ते ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत नवीन मतदार यादीसाठी नाव नोंदणी केली जाणार आहे. कोकण विभागातील पदवीधर आणि शिक्षकांनी या प्रक्रियेत सहभाग घेवून मतदार नोंदणी करावी, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले.
भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक व कोकण पदवीधर मतदारसंघाची टप्प्या टप्याने नव्याने मतदारयादी तयार केली जाणार असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिक्षक मतदार संघाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या यादीमध्ये असणाऱ्यांनी सुध्दा नवीन यादी तयार करण्यासाठी विहीत नमुन्यात नव्याने अर्ज सादर करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव दाखल करण्यासाठी मतदार नोंदणी अर्जासोबत संबंधित व्यक्तीने दिनांक १ नोव्हेंबर २०२३ पूर्वी लगतच्या सहा वर्षांमध्ये एखादया माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये एकूण किमान तीन वर्ष अध्यापनाचे काम केले असल्याबाबत शैक्षणिक संस्था प्रमुखाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पदवीधर मतदार संघाच्या सध्याच्या मतदार यादीत नाव असणाऱ्यांना सुध्दा नवीन यादी तयार करण्यासाठी नवा अर्ज भरणे बंधनकारक आहे. पदवीधर मतदार संघाच्या अर्हतेसाठी त्या मतदार संघातील सर्वसाधारण रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच १ नोव्हेंबर २०२३ पुर्वी किमान ३ वर्षे भारताच्या राज्यक्षेत्रातील विद्यापीठाची एकतर पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समतुल्य असलेली अर्हता धारण करीत असेल अशांना मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल, असेही डॉ. कल्याणकर यांनी स्पष्ट केले आहे.