नवी मुंबई - खारघर येथील सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे गेल्या आठ महिन्यांपासून वेतन थकीत आहे. थकीत वेतनामुळे कॉलेजमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन चालू केले आहे. आंदोलनाचा दहावा दिवस उजाडला असून, याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्याने शिक्षकवर्गाकडून तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला. बुधवार, ४ एप्रिल रोजी अचानक महाविद्यालयाच्या प्राचार्या मंजुषा देशमुख यांनी पाच शिक्षक, कर्मचाºयांच्या हजेरीबुक समोर लाल रेष मारून संबंधित शिक्षकांची सेवा समाप्त झाल्याचे कळविल्याने उपजीविकेवर गदा आल्याचा तीव्र संताप या शिक्षकांनी व्यक्त केला.वेतन नाही, त्यात हेतुपुरस्सर अचानक सहकाºयांवर झालेल्या कारवाईने सर्व स्टाफ प्राचार्यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या केबिनमध्ये गेला व त्यांना घेराव टाकला. वेतन न देता कर्मचाºयांना कामावरून कसे कमी करता, असे विचारल्यावर प्राचार्यांनी उद्धटपणे उत्तरे दिली. वेतन लगेच करता येणार नाही आणि ज्यांना काढले आहे त्यांना परत घेण्यासही त्यांनी नकार दिला. वेतन द्यायचे नाही, तसेच कर्मचाºयांना कामावर काढून टाकायचे, असली मनमानी प्राचार्या मंजुषा देशमुख करीत असल्याने महाविद्यालयाच्या कर्मचाºयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. गेल्या महिनाभरापासून दोन वेळा स्मरणपत्र पाठवूनही मुंबई विद्यापीठ, तंत्रशिक्षण संचालक, एआयसीटीई आणि महाराष्ट्र शासनदेखील आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे मुक्ता शिक्षक संघटनेचे महासचिव सुभाष आठवले यांनी सांगितले. कर्मचाºयांच्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास त्याला प्राचार्य देशमुख याच जबाबदार असतील. त्यांचे हे मनमानी वर्तन थांबले नाही तर त्यांच्यावर छळवणुकीचा गुन्हा दाखल करावा लागेल, असेदेखील त्यांनी सांगितले. शासनाने या प्रकरणी दखल घेत ताबडतोब शिक्षकांचे थकीत पगार दिले जावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.शासनाकडून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठीचे पैसे आजवर जमा झालेले नाहीत, अशी सबब सांगत शिक्षकांचा पगार थांबविला जात असल्याचेही मुक्ता शिक्षक संघटनेच सचिव सुभाष आठवले यांनी स्पष्ट केले.वेतन थांबविल्याप्रकरणी मुख्याध्यापिकेला जाब विचारला असता, अरेरावीची भाषा केल्याने तसेच त्यामुळे आलेल्या मानसिक ताणामुळे व्यथित होऊन तेथील महाविद्यालयाच्या प्राध्यापिका भूमी घरत यांना चक्कर आली व त्या जमिनीवर कोसळल्या. त्याच क्षणी त्यांना जवळच्या निरामय हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात दाखल केले असून अजूनही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.शासनाकडून निधीच मिळालेला नाहीशासनाच्या समाज कल्याण विभागाकडून दहा कोटी रुपयांचा निधी महाविद्यालयाला मिळालेला नाही, त्यामुळे शिक्षकांचा पगार देणे शक्य झालेले नाही, अशी प्रतिक्रिया मंजुषा देशमुख यांनी व्यक्त केली. कोणत्याही शिक्षकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आलेले नाही, यामध्ये केवळ वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट संपला असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.
शिक्षकांचे असहकार आंदोलन, ८ महिन्यांपासून वेतन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 6:55 AM