नवी मुंबई : विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या शिक्षकाच्या डीएनए चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच याप्रकरणाचे दोषारोपपत्र पोलिसांकडून आठवड्याभरात न्यायालयात सादर केले जाण्याची शक्यता आहे. एमजीएम विद्यालयातील १३ वर्षीय विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे.नेरूळ येथील एमजीएम विद्यालयातील १३ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना सप्टेंबर २०१६ मध्ये समोर आली होती. विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल केले असता, चाचणीमध्ये ती गरोदर असल्याचे उघड झाले. यावेळी त्याच शाळेतील राज शुक्ला या शिक्षकाने बलात्कार केल्याची तक्रार विद्यार्थिनीच्या सांगण्यावरून तिच्या पालकांनी नेरूळ पोलिसांकडे केली होती. परंतु गुन्हा दाखल केल्यानंतरही नेरूळ पोलीस शुक्ला याला अटक करत नसल्याच्या निषेधार्थ खासदार राजन विचारे यांनी या प्रकरणात लक्ष घातले होते. त्यानंतर डिसेंबर महिन्यात एमजीएम शाळेवर सर्वपक्षीय मोर्चा काढून शुक्लाला पाठीशी घालणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकावर देखील कारवाईची मागणी करण्यात आली होती. अखेर राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सहाय्यक निरीक्षक वासुदेव मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून तपास गुन्हे शाखेकडे सोपवला होता. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्ला याला दिल्ली येथून अटक केली आहे. अटकेनंतर त्याची डीएनए चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल नुकताच नवी मुंबई पोलिसांना प्राप्त झाला असून तो नकारात्मक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विद्यार्थिनीचा गर्भपात करतेवेळी गर्भाचा डीएनए घेण्यात आला होता. त्याच्याशी शुक्लाचा डीएनए जुळत नसल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे. या अहवालासह संपूर्ण प्रकरणाचे दोषारोपपत्र पोलिसांकडून येत्या काही दिवसांत न्यायालयापुढे सादर केले जाणार आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये गुन्हा दाखल झाला तेव्हाच परिमंडळ उपआयुक्तांकडे अर्ज देवून शुक्लाने स्वत:ची डीएनए चाचणी घेण्याची मागणी केली होती. त्यास पोलिसांकडून दिरंगाई होत आहे. (प्रतिनिधी)
शिक्षकाचा अहवाल नकारात्मक?
By admin | Published: February 15, 2017 4:55 AM