नवी मुंबई : महाराष्ट्र राज्यातील ज्युनियर कॉलेजमधील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करीत लक्ष वेधण्यासाठी मुंबई रिजनल ज्युनियर कॉलेज टीचर्स आॅर्गनायझर्स यांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ३0 जानेवारी रोजी वाशी रेल्वे स्थानक ते माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये ज्युनियर कॉलेजचे शिक्षक उपस्थित होते.शासनाच्या परवानगीनंतर ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक भरती करण्यात आली आहे, परंतु राज्यातील अनेक शिक्षकांचे वेतन प्रलंबित आहे. ६ व्या वेतन श्रेणीनुसार वेतन मिळत नाही शिक्षकांच्या अशा अनेक मागण्या प्रलंबित असल्याचे संघटनेचे अध्यक्ष एस.एल.दीक्षित यांनी सांगितले. या मूक मोर्चामध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शिक्षक सहभागी झाले होते. शासनाने प्रलंबित मागण्या मान्य न केल्यास पेपर तपासणीसाठी शिक्षक सहकार्य करणार नसल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचा मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:02 AM