गटशिक्षणाधिकारी करणार अध्यापन
By admin | Published: August 21, 2015 11:26 PM2015-08-21T23:26:05+5:302015-08-21T23:26:05+5:30
सफाळेजवळील एडवणच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची रिक्त पदे भरली जात नसल्याने संतप्त झालेल्या पालकांनी गुरुवारी शाळेला टाळे ठोकल्याचे
पालघर : सफाळेजवळील एडवणच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची रिक्त पदे भरली जात नसल्याने संतप्त झालेल्या पालकांनी गुरुवारी शाळेला टाळे ठोकल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर शुक्रवारी पालघर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी माधवी दवणे-तांडेल यांनी स्वत: शाळेला भेट देऊन एका शिक्षकाची नियुक्ती केली. तर, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून स्वत: शाळेत अध्यापनाचे काम करणार असल्याचे सांगितल्यानंतर पालकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गांत १९५ विद्यार्थी शिक्षण घेत असून पटसंख्येच्या निकषाप्रमाणे एक मुख्याध्यापकासह सहा शिक्षक असणे अत्यावश्यक असताना फक्त चारच शिक्षकांवर विद्यार्थ्यांच्या शिकवणीचे काम सोपविले जात होते. त्यामुळे शाळा चालविताना शिक्षकांनाही अनेक अडचणी निर्माण होत होत्या. याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याने अनेक निवेदने देऊनही शिक्षकांची रिक्त पदे भरली जात नसल्याने गुरुवारी संतप्त झालेल्या पालकांनी शाळेलाच टाळे ठोकून ठिय्या आंदोलन सुरू केले होते.