नवी मुंबई : रविवारी नवी मुंबईतले तापमान ४२ डिग्री अंशावर पोचले होते. यामुळे दुचाकीस्वारांसह पादचाऱ्यांच्या अंगाची लाही लाही झाली. मागील दोन महिन्यांतला तापमानाचा हा उच्चांक असून उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात कमालीची वाढ झाली.देशाच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार रविवारी या उष्ण लाटेची झळ नवी मुंबईकरांना चांगलीच बसली. सकाळी ७ वाजल्यापासूनच तापमान ३० अंश डिग्रीच्या आसपास होते. हे तापमान दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ४२ डिग्रीवर पोचले होते. पुढील अडीच तास तापमानाचा हा पारा कायम होता. त्यामुळे दुपारच्या सुमारास कामानिमित्ताने घराबाहेर निघालेल्यांच्या अंगाची चांगलीच लाही लाही झाली. अनेकांनी उष्णतेच्या लाटेची कल्पना असल्याने दुपारनंतर घराबाहेर निघायचे देखील टाळले. मात्र कामानिमित्ताने घराबाहेर निघालेल्या पादचारी व दुचाकीस्वारांना उन्हाचे तीव्र चटके सहन करावे लागले. ज्यांना उष्ण लाटेची कल्पना नव्हती, त्यांना तापमानातील अचानक झालेल्या बदलामुळे पुढील दोन महिन्यांतील उन्हाळ्याची कल्पना देखील सहन होत नव्हती. बस थांब्यावरील प्रवासी, सिग्नलला उभे राहणारे दुचाकीस्वार, मोकाट भटके प्राणी या प्रत्येकाकडून उन्हाचे चटके टाळण्यासाठी झाडांच्या सावलीचा आधार शोधला जात होता.रविवारी झालेली तापमानातील वाढ ही मागील दोन महिन्यांतील सर्वाधिक होती. मागील अनेक दिवसांपासून शहराचे तापमान ३५ ते ३८ डिग्रीपर्यंत जात होते. त्यामुळे उन्हाळा सुरू झाल्याची चाहूल अनेकांना लागलेलीच होती. मात्र तापमान ४२ अंशापर्यंत जाईल याची अपेक्षा नवी मुंबईकरांनी केलेली नव्हती. उष्णतेची ही झळ आठवड्याभरात तीन वेळा नवी मुंबईकरांंना बसणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारप्रमाणेच मंगळवार व शुक्रवारी देखील देशात अनेक ठिकाणी पुन्हा अशी उष्ण लाट येणार आहे. त्यावेळी देखील नवी मुंबईतील तापमानाचा पारा ४२ डिग्रीच्या वर जाण्याची शक्यता आहे. अशावेळी लहान मुलांना घराबाहेर नेण्याचे टाळावे असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
तापमान ४२ अंशावर, अंगाची लाही लाही, दोन महिन्यांतला उच्चांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 2:49 AM