जयंत धुळप , अलिबागमंगळवार, २८ मार्च रोजी देशातील सर्वाधिक कमाल ४६.५ अंश सेल्सिअस तापमान माणगाव तालुक्यातील भिरा येथे होते. ही नोंद योग्य असल्याचा दावा पाली-सुधागड येथील जे. एन. पालीवाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा भौतिकशास्त्रांचे तज्ज्ञ प्रा. सुधीर पुराणिक व त्यांच्या पत्नी तथा रसायनशास्त्राच्या तज्ज्ञ प्रा. अंजली पुराणिक या प्राध्यापक दाम्पत्याने केला आहे. पाली ते भिरा या परिसरातील विविध ठिकाणच्या तापमानांची प्रत्यक्ष नोंद घेऊन केलेल्या अभ्यासांती केला आहे.गेल्या मंगळवारी या विक्रमी नोंदीच्या बातम्या सर्वत्र प्रसारित झाल्या आणि या तापमान नोंदीबाबत उलट-सुलट चर्चा कानावर येऊ लागल्या. भिरा येथील तापमापक नादुरुस्त असावे आणि त्यामुळे अशी चुकीची विक्रमी नोंद झाली असावी, अशीही शंका व्यक्त करण्यात आली. भौतिकशास्त्राचा प्राध्यापक म्हणून या बाबत विचारणा करणारे अनेकांचे फोनदेखील आले. या साऱ्या पार्श्वभूमीवर पाली ते भिरा या परिसरातील विविध ठिकाणच्या तापमान नोंदी घेण्याचा निर्णय घेऊन वास्तवाचा वेध घेण्याचा हा प्रयत्न केला असल्याचे सुधीर पुराणिक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.शुक्रवारी दिवसभर विशेषत: सकाळी ११ वाजल्यापासून तापमानाच्या नोंदी घेण्यास प्रारंभ केला. तापमान नोंदी घेण्याकरिता पारा असलेला तापमापक वापरला आहे. प्रा. अंजली पुराणिक यांच्या एका सुरू असलेल्या संशोधनाच्या निमित्ताने आमच्या पालीमधील घराच्या गच्चीमध्येच आम्ही एक कायमस्वरूपी थर्माेकपल तापमापक बसविलेला आहे. त्यावरील १०.३० वाजताची तापमान नोंद ३९ अंश सेल्सिअस प्राप्त झाली. त्यानंतर पाली येथून भिराकडे प्रवासास प्रारंभ केल्याचे प्रा. पुराणिक यांनी सांगितले.
भिरा येथील तापमान विक्रमीच
By admin | Published: April 01, 2017 11:53 PM