नवी मुंबई : भरधाव टेम्पोने धडक दिल्याने एनएमएमटी बसचा अपघात झाला. ही घटना वाशीतील अरेंजा सर्कल येथे घडली. टेम्पोच्या धडकेने बस वळून रस्त्यालगतच्या बंद दुकानावर आदळली. त्यामध्ये चालक-वाहकासह पाच प्रवासी जखमी झाले. वाशी पोलिसांनी घटनास्थळावरून टेम्पो चालक फिरोज शेखला अटक केली. तो गोवंडीचा रहिवासी आहे. मार्ग क्रमांक ३१ वरील कोपरखैरणे-उरण ही बस बुधवारी सकाळी ६.१५ च्या सुमारास उरणवरून कोपरखैरणेला परत जात होती. ती अरेंजा चौकात आली असता डाव्या बाजूने आलेल्या भरधाव टेम्पोने धडक दिली. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस डावीकडे वळून पदपथावर चढून टायरच्या दुकानावर धडकली. सकाळची वेळ असल्याने बसमध्ये अवघे ९ ते १० प्रवासी होते. त्यापैकी पाच प्रवासी जखमी झाले. तर बसचालक मधुकर वांद्रे (४७) हे बसमध्येच अडकले होते. रस्त्यालगतचा नो पार्किंग फलकाचा लोखंडी खांब व दुकानाचे लोखंडी शटर यावर ही बस आदळली. प्रवासी व वाहक धर्मेंद्र गायकवाड यांनी वांद्रे यांची सुखरूप सुटका केली.जखमी प्रवासी व चालक - वाहक यांना उपचारासाठी वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी पाठवल्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक एस.बी. सहाने यांनी सांगितले. अपघातात बसचे तसेच टायर दुकानाचे शटर व आतील काचेचा दरवाजा तुटून आर्थिक नुकसान झाले आहे. एपीएमसी व पामबीच मार्गाला जोडणारा हा मुख्य चौक असल्याने तिथे सतत रहदारी असते. मात्र वाहनचालकांकडून वेगात वाहने चालवली जात असल्याने यापूर्वीही तिथे अपघात झाले आहेत. (प्रतिनिधी)
वाशीत भरधाव टेम्पोची बसला धडक
By admin | Published: July 23, 2015 3:49 AM