डुकरांनी भरलेला टेम्पो उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 04:47 AM2018-06-14T04:47:36+5:302018-06-14T04:47:36+5:30
डुकरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा एक टेम्पो ठाणे - बेलापूर महामार्गावरील घणसोली रेल्वे स्थानकाजवळ पलटी झाला.
नवी मुंबई : डुकरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा एक टेम्पो ठाणे - बेलापूर महामार्गावरील घणसोली रेल्वे स्थानकाजवळ पलटी झाला. या अपघातात टेम्पोतील दोन डुकरे जागीच ठार झाली आहेत. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान, याप्रकरणी रबाले-एमआयडीसी पोलीस ठाण्यात टेम्पो चालक आणि क्लिनरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
टेम्पो चालक रेनोल्ड पितर परेरीया आणि क्लीनर सोल्विन डिसिल्वा अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही वसई येथील रहिवासी आहेत. बुधवारी सकाळी पुण्याहून डुकरांनी भरलेला टेम्पो वसईकडे घेवून जात असताना ठाणे-बेलापूर मार्गावरील घणसोली स्थानकाजवळ हा टेम्पो पलटी झाला. टेम्पोत ३६ डुकरे होती. विक्रीसाठी ती वसई येथे नेली जात होती. दरम्यान, या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती. दरम्यान, कोपरखैरणे येथील प्राणिमित्र श्रीकांत दत्तात्रेय रासकर यांनी याप्रकरणी रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक अनिल गलुगडे तपास करीत आहेत.