नवी मुंबई : टेम्पो चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 14 गुन्ह्यांची उकल झाली असून त्यामधील 10 टेम्पो, एक मोटरसायकल व इतर वाहनांचे सुट्टे भाग जप्त करण्यात आले आहेत.
नवी मुंबईत होणाऱ्या वाहन चोरीच्या घटनांच्या अनुशंघाने गुन्हे शाखा पोलिस तपास करत होते. त्यामध्ये एका टेम्पो चोरीच्या गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा कक्ष दोनच्या पथकाला एका चोरट्याची माहिती मिळाली होती. याप्रकरणी अधिक तपासासाठी गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे, सहायक आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष दोनचे निरीक्षक उमेश गवळी, सहायक निरीक्षक प्रवीण फडतरे, उपनिरीक्षक मानसिंग पाटील, दिलीप भंडे, सुनील गिरी, मधुकर गाडगे, तुकाराम सूर्यवंशी, रणजित पाटील, रमेश शिंदे, सागर रसाळ, दीपक डोंगरे आदींचे पथक करण्यात आले होते.
या पथकाने पनवेलमधून अन्वर पठाण याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच दोन वर्षांपासून तो टेम्पो चोरी करत असून चोरीचे टेम्पो राज्याच्या विविध भागात विकले असल्याचेही सांगितले. त्यानुसार गुन्हे शाखा पथकाने जालनामधून मन्नान शेख तर बीड मधून फिरोज मुल्ला यांना अटक केली. त्यांच्या अधिक चौकशीत वाहनचोरीचे 14 गुन्हे उघड झाले आहेत. त्यामधील 10 टेम्पो, एक मोटरसायकल व इतर चोरीच्या वाहनांचे सुट्टे भाग असा साडे आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या टोळीने इतरही वाहने चोरली असल्याचा संशय आहे. बीड, जालना, परभणी, अहमदनगर तसेच इतर ग्रामीण भागात मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतुकीला छोटे टेम्पो वापरले जातात. त्यामुळे नवी मुंबई व ठाणे परिसरातून छोटे टेम्पो चोरी करून सदर ठिकाणी त्यांची विक्री केली जात होती. जप्त केलेली वाहने संबंधितtठिकाणच्या स्थानिक पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आली आहेत.