प्र्रशासकीय भवनासाठी हवी दहा एकर जागा
By admin | Published: January 6, 2017 05:24 AM2017-01-06T05:24:37+5:302017-01-06T05:24:37+5:30
पनवेल महानगरपालिका भवन भव्य असावे, यासाठी प्रशासनाने सिडकोकडे दहा एकर जागेची मागणी केली आहे. तसेच महापौर आणि आयुक्त निवासाकरिता नवीन पनवेल
अरुणकुमार मेहत्रे , कळंबोली
पनवेल महानगरपालिका भवन भव्य असावे, यासाठी प्रशासनाने सिडकोकडे दहा एकर जागेची मागणी केली आहे. तसेच महापौर आणि आयुक्त निवासाकरिता नवीन पनवेल व खारघरमध्ये भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विभागीय कार्यालये ग्रामपंचायत व सिडको कार्यालयात ठेवण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात सिडकोबरोबर सकारात्मक बोलणी सुरू असल्याचे समजते.
महापालिकेत आयुक्तांबरोबरच, अतिरिक्त आयुक्त, उप आणि सहायक आयुक्तच प्रशासनात वरिष्ठ अधिकारी असणार आहेच. त्याचबरोबर अभियंत्याची भरतीही करण्यात येणार आहे. महापालिकेत विविध समिती, त्याचबरोबर सभापतींचा समावेश असेल. नगरपरिषदेपेक्षा महापालिकेचा कारभार विस्तारित होणार आहे. सध्या मनुष्यबळ कमी असल्याने जागेची अडसर जाणवत नाही. मात्र, भविष्यात कामकाजासाठी प्रशस्त इमारतीची आवश्यकता भासणार आहे. त्या दृष्टिकोनातून कोणत्या ठिकाणी महापालिकेचे मुख्यालय असू शकते, याबाबत सर्व्हे करण्यात आला आहे.
खांदा वसाहतीतील सर्कस मैदान, आसुडगाव बस आगारासमोर मोकळे मैदान आणि खांदेश्वर रेल्वे स्थानकालगतची मोकळी जागा महापालिका भवन उभारण्याकरिता मिळावी, यासाठी सिडकोकडे आग्रह धरण्यात आला आहे. तक्का येथील जागेवर प्रस्तावित पनवेल महापालिकेचे प्रशासकीय भवन असावे, असा ठराव पूर्वी झाला होता; परंतु ही जागा अपुरी पडेल, तसेच येण्या-जाण्याच्या दृष्टीने सोईस्कर वाटत नाही. सिडको हद्दीतच महापालिका भवन असावे, असा प्रस्ताव आहे. तीन ठिकाणांपैकी एका ठिकाणी दहा एकर जागा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. तिथे महापालिका आयुक्त व इतर अधिकाऱ्यांकरिता दालन, विविध विभागांकरिता स्वतंत्र बसण्याची व्यवस्था, सुविधा केंद्र, सभागृह, शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय पाणी तसेच पार्किंगची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव आहे. अत्याधुनिक स्वरूपाची सोय-सुविधा या ठिकाणी विकसित करण्याबरोबरच लिफ्ट, सरकते जिने, सीसीटीव्ही, वायफाय, स्वागत कक्षाची व्यवस्था असावी, असा प्रस्ताव आहे.
राष्ट्रीय महामार्ग बाजूलाच आहे. त्याशिवाय बाजूलाच प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. नागरिकांना प्रशासकीय भवन अतिशय सहजपणे गाठता येईल. त्याचबरोबर नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे आणि खारघर वसाहतीत विभागीय कार्यालये असणार आहेत.