विमानतळबाधित दहा गावांच्या स्थलांतराची मुदत संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 06:15 AM2019-01-17T06:15:44+5:302019-01-17T06:15:57+5:30
अखेरच्या दिवशी मंगळवारी उत्स्फूर्त प्रतिसाद : पाच गावे १०० टक्के रिकामी
नवी मुंबई : विमानतळबाधित दहा गावांतील ग्रामस्थांना स्थलांतरासाठी दिलेली अखेरची मुदत मंगळवारी संपली. यानंतर कोणतीही मुदत दिली जाणार नसल्याने त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अखेरच्या दिवशी प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतराच्या प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, शेवटच्या टप्प्यात अर्ज देताना विमानतळबाधितांची गैरसोय होऊ नये, यासाठी सिडकोचा संबंधित विभाग रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आला होता.
दहा गाव संघर्ष समितीच्या विनंतीनुसार ग्रामस्थांना स्थलांतरासाठी १५ जानेवारीची अंतिम मुदत होती. मंगळवारी शेवटच्या टप्प्यात बांधकामे निष्कासित करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या प्रमाणात अर्ज सादर केले.
सध्या स्थलांतरित होणाऱ्या दहा गांवापैकी वाघिवलीचा अपवाद वगळता उर्वरित नऊ गावे ९५ टक्के रिकामी झाल्याचा दावा सोमवारी सिडकोकडून करण्यात आला होता. मंगळवारी अखेरच्या दिवशी १०० टक्के स्थलांतर होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळपासून सिडकोच्या संबंधित विभागात प्रकल्पग्रस्तांची गर्दी होती.
शेवटच्या दिवसापर्यंत दहा गावांपैकी गणेशपुरी, तरघर, वाघिवली वाडा व वरचे ओवळे ही पाच गावे एक-दोन प्रकरणांचा अपवाद वगळता १०० टक्के रिकामी झाली आहेत. तर कोल्ही आणि चिंचपाडा ही दोन गावे ९५ टक्के स्थलांतरित झाली आहेत.
उलवे आणि कोंबडभुजे या दोन गावांतून ७० टक्के ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. वाघिवली या गावाचा विमानतळ गाभा क्षेत्राबाहेर समावेश होत असल्याने तूर्तास सिडकोला या गावाच्या स्थलांतराची घाई नाही. असे असले तरी आतापर्यंत या गावातील १५३ कुटुंबांपैकी ९० जणांनी स्थलांतर केले आहे.
अर्जांची दोन दिवसांत पडताळणी करणार
बांधकाम निष्कासित करण्यासाठी अंतिम मुदतीच्या आत प्राप्त झालेल्या अर्जाची पुढील दोन दिवसांत संबंधित गावांत जाऊन पडताळणी केली जाईल. बांधकामे निष्कासित केल्याची खातरजमा केली जाणार आहे. त्यानंतर हा संपूर्ण अहवाल राज्य शासनाला पाठविला जाणार आहे. विशेष म्हणजे, ज्यांनी अर्ज दिले नाहीत; परंतु बांधकामे निष्कासित केली आहेत, त्यांचे त्याच दिवशी अर्ज स्वीकारले जातील, असे आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचे मुख्य भूमी व भूमापन अधिकारी विजय पाटील यांनी स्पष्ट केले.