नवी मुंबईसह पनवेलमध्ये पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन; १३ जुलैपर्यंत कडक अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 04:14 AM2020-07-02T04:14:51+5:302020-07-02T04:15:07+5:30
मुंबईतील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू ठेवली जाणार आहे. ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतही सुरू राहणार असल्याची माहिती आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली आहे.
नवी मुंबई/पनवेल : नवी मुंबईसह पनवेलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पनवेल महापालिकेने ३ ते १३ जुलैदरम्यान १0 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेनेसुद्धा ४ जुलैपासून १३ जुलैपर्यंत संपूर्ण नवी मुंबईत लॉकडाऊन जाहीर केला आहे.
पनवेल महानगरपालिका व ग्रामीण भागातील रुग्णांची एकूण संख्या ३ हजारपेक्षा जास्त झाली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने पनवेलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यास पनवेल महानगरपालिका प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. परंतु नागरिकांचा त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. विनाकारण घराबाहेर पडणे, मास्कचा वापर न करणे, शारीरिक अंतराचे बंधन न पाळणे आदी प्रकार सर्रास होत आहेत. अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६२ जणांवर महापालिकेने सोमवारी दंडात्मक कारवाई केली आहे. लॉकडाऊन शिथिल केल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका क्षेत्रात पुन्हा दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्यात येत असल्याची घोषणा महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मंगळवारी केली.
नवी मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रतिदिन दोनशेपेक्षा जास्त रुग्ण वाढत आहेत. सद्य:स्थितीमध्ये रुग्णांचा आकडा ६८२३ वर पोहोचला आहे. आतापर्यंत २१७ जणांचा मृत्यू झाला आहे. महानगरपालिकेने १२ ठिकाणी विशेष लॉकडाऊन सुरू केला आहे. परंतु याव्यतिरिक्त शहरातील इतर ठिकाणीही रुग्ण वाढत आहेत. यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासून दहा दिवस संपूर्ण नवी मुंबईमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. ४ ते १३ जुलैदरम्यान संपूर्ण नवी मुंबईमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सुरू ठेवली जाणार आहेत. या कालावधीत कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी विशेष सर्वेक्षण मोहीम व औषध फवारणी केली जाणार आहे.
मुंबईतील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू ठेवली जाणार आहे. ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतही सुरू राहणार असल्याची माहिती आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली आहे.
महापालिका आयुक्तांचे पनवेलकरांना आवाहन
महापालिका क्षेत्रासह पनवेल ग्रामीण भागातसुद्धा लॉकडाऊन करण्यात आले आहे. पनवेल ग्रामीण भागात उलवे सेक्टर १९, २३, ५, ८, १७, १८, विचुंबे, पालीदेवद, सुकापूर, करंजाडे सेक्टर १, ३, ४, ५ अ, ६ आदई, उसर्ली व आकुर्ली या ठिकाणी ३ ते १३ जुलैदरम्यान लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत जीवनावश्यक वस्तू, भाजी, औषधांसह विविध जीवनावश्यक वस्तूंचा दहा दिवस पुरेल इतका साठा करून ठेवण्याचे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नागरिकांना केले आहे.