दहा गावांतील ठेकेदारांचे साखळी उपोषण, ३०० पेक्षा जास्त डंपर ठेवले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 02:15 AM2017-11-25T02:15:41+5:302017-11-25T02:15:52+5:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामांना मोठ्या प्रमाणात गती आली आहे. सिडकोने जोरात या कामांना सुरुवात केली आहे.
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामांना मोठ्या प्रमाणात गती आली आहे. सिडकोने जोरात या कामांना सुरुवात केली आहे. मात्र, या कामांमध्ये मोठे ठेकेदार, सिडको प्रशासन स्थानिक प्रकल्पग्रस्त ठेकेदारांवर अन्याय करीत आहेत. ठरल्याप्रमाणे संबंधितांना योग्य मोबदला दिला जात नसल्याने दहा गावांतील स्थानिक विमानतळ बाधित ठेकेदारांनी प्रशासन व मोठ्या ठेकेदारांविरोधात बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. प्रकल्पग्रस्त लॉरीमालक कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून स्थानिक व्यावसायिकांनी शुक्रवारी ओवळे ग्रामपंचायत हद्दीत बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.
शेकडो विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्त ठेकेदार या उपोषणात सहभागी झाले आहेत. प्रकल्पग्रस्त कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, सचिव विकास म्हात्रे, उपाध्यक्ष विजय मेहेर, कमी तारेकर यांच्यासह या वेळी शेकडो ठेकेदार उपोषण स्थळी उपस्थित होते. तसेच होणाºया अन्यायाविरोधात विमानतळ क्षेत्रात कार्यरत असलेले ३०० डंपर, जेसीबी बंद ठेवण्याचा निर्णय या ठेकेदारांनी घेतला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीच्या कामांमध्ये प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना प्रकल्पात रोजगार दिले जातील, या अनुषंगाने या ठिकाणी कामे दिले जातील, असे सिडकोने मान्य केले आहे. सिडकोच्या विविध विकासकामांचे टेंडर जीव्हीके, गायत्री आणि बालाजी या बड्या कंत्राटदारांनी घेतले आहे. तर कंत्राटदारांचे सब कंत्राटदार म्हणून टीआयपीएल आणि जेएम म्हात्रे इन्फ्रा यांनी एकत्रित भागीदारी करून काम हाती घेतले आहे. प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना या ठिकाणच्या विकासकांमाच्या अनुषंगाने सिडको प्रशासनाने १६ सप्टेंबर रोजी बैठक घेऊन त्यांना डंपर, पोकलेन यांचे प्रतिफेरीचे दर निश्चित करून दिले. या यानुसार पोकलेन प्रतितास १६५० (बकेट), पोकलेन प्रतितास १९५० (ब्रेकर), तर डंपर प्रतिफेरी ६५० रु पये २ कि.मी.पर्यंत असा दर ठरला. १५ नोव्हेंबरपर्यंत या दराप्रमाणे मोठ्या ठेकेदारांनी आपली वाहने चालवली. सब कंत्राटदारांकडे सुरू केली.
सिडकोने दिलेले दर हे १५ नोव्हेंबरपर्यंत लागू असल्याने त्यानंतर नव्याने दर ठरविण्यासाठी प्रकल्पग्रस्त ठेकेदार सब कंत्राटदाराकडे गेल्याने त्यांना पोकलेनचा दर प्रतिडंपर २७५ रु पये (बकेट) तर डंपर दर प्रतिफेरी ४०० रु पयांपर्यंत देण्याचा प्रस्ताव देण्यात आला. या नवीन दरामध्ये पूर्वीच्या दरापेक्षा मोठी तफावत असल्याने या नवीन दरानुसार आमच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याने या ठेकेदारांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारत आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी सिडको व्यवस्थापकीय संचालकांना पत्र पाठवून यासंदर्भात मध्यस्तीची भूमिका घेण्याची विनंती केली आहे.
प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या उपोषणाला शांततेत सुरु वात करण्यात आली. या वेळी पोलिसांचाही मोठा फौजफाटा उपोषणस्थळी उपस्थित होता. या उपोषणाला काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत व कामगारनेते महेंद्र घरत यांनी पाठिंबा दर्शविला. ठेकेदारांच्या भूमिकेमुळे विमानतळ क्षेत्रातील कामांची गती मंदावणार आहे.