नवी मुंबई : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कळंबोली येथून दहा किलो 365 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. कळंबोली येथून आरोपीच्या घरासमोरुन तो जप्त केला असून पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पलायन केले आहे. त्याच्याविरोधात कळंबोली पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लहू नामा कडव (55) असे पळालेल्या आरोपीचे नाव असून तो कळंबोली गावचा राहणारा आहे. सदर ठिकाणी गांजाचा मोठय़ा प्रमाणात साठा विक्रीसाठी आणला जाणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या उपनिरीक्षक राणी काळे यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरिक्षक रविंद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली काळे यांच्या पथकाने गुरुवारी सापळा रचला होता. त्यामध्ये हवालदार कासम पिरजादे, इक्बाल शेख, संजयकुमार ठाकूर, रमेश उटगीकर, सचिन भालेराव तसेच बाबा सांगोलकर यांचा समावेश होता.
यावेळी लहू कडव हा गांजा घेवून त्याठिकाणी आला. परंतु पोलिसांनी सापळा रचल्याची चाहूल लागताच त्याने मुद्देमाल सोडून पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन पकडण्याचा प्रयत्न केला असता, तो हाती लागला नाही. यावेळी घटनास्थळी हाती लागलेल्या गांजाचे पोलिसांनी मुल्यपान केले असता तो 1 किलो 365 ग्रॅम वजनाचा असल्याचे आढळून आले. बाजारभावानुसार तो 1 लाख 72 हजार 84 रुपये किमतीचा आहे. याप्रकरणी लहू कडव याच्याविरोधात कळंबोली पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
गुन्हे शाखेच्या याच पथकाने दोन दिवसांपुर्वी नेरुळ येथे गांजा ओढणाऱ्या तिघांवर कारवाई केली आहे. त्यांच्याविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.