नवी मुंबईत दहा हजार रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 12:52 AM2020-07-31T00:52:54+5:302020-07-31T00:53:22+5:30

कोरोनामुक्तीचा टक्का वाढतोय : चाचणीसाठी लागणारा विलंबही थांबला : मृत्युदर कमी करण्यावर लक्ष

Ten thousand patients corona free in Navi Mumbai | नवी मुंबईत दहा हजार रुग्ण कोरोनामुक्त

नवी मुंबईत दहा हजार रुग्ण कोरोनामुक्त

Next

नामदेव मोरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी त्यासोबत कोरोनामुक्त होण्याची टक्केवारीही दिवसेंदिवस वाढू लगली आहे. शहरात गुरुवारी ३६२ रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १० हजार ११६ झाली आहे. ६७ टक्के रुग्ण बरे करण्यात यश आले असून यापुढे ही टक्केवारी वाढवून दुसरीकडे मृत्युदर शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी चालेल; परंतु एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जास्तीतजास्त चाचण्या करायच्या. कोरोना झालेले निदर्शनास येताच तत्काळ उपचार सुरू करून त्यांना बरे करायचे. मृत्युदर ३ वरून शून्यावर आणायचा हे उद्दिष्ट निश्चित केले आहे. १३ मार्चपासून तब्बल १३९ दिवस महापालिका प्रशासन कोरोनाविरोधात लढा देत आहे. या प्रयत्नांना आता यश येऊ लागले आहे. एक महिन्यापूर्वी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांवर पोहोचले होते. त्यामध्ये वाढ होऊन ६७ टक्के झाले आहे. गुरुवारी एका दिवसात तब्बल ३६२ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे दहा हजारांचा टप्पा पूर्ण करण्यात यश आले आहे. आतापर्यंत तब्बल १० हजार ११६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामधील बहुतांश रुग्णांनी महानगरपालिकेच्या केंद्रामध्ये उपचार घेतले आहेत.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळू लागला आहे. कोरोनाविषयी असणारी भीती कमी होत आहे. कोरोना रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू लागला आहे. सुरुवातीला कोरोना झालेल्या रुग्णांना व त्यांच्या परिवारातील नागरिकांना अप्रत्यक्षपणे सामाजिक बहिष्कारास सामोरे जावे लागत होते. कोरोना झालेल्या रुग्णांना धक्का बसून त्यांचे मनोबल खचत असल्याचेही पाहावयास मिळत होते. ऐरोलीमध्ये एका रुग्णास कोरोना झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू झाल्याचेही समोर आले होते. यामुळे कोरोना होऊ नये यासाठी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. परंतु कोरोना झाला तर घाबरून जाऊ नये. वेळेत उपचार घेतल्यास व योग्य खबरदारी घेतल्यास कोरोना बरा होऊ शकतो हे १० हजार रुग्ण बरे झाल्यानंतर शहरवासीयांच्याही लक्षात आले आहे.
दोन लाख नागरिकांचे क्वारंटाइन
च्कोरोना रुग्ण निदर्शनास आल्यास त्यांच्या संपर्कातील किमान
२० नागरिकांपर्यंत पोहोचण्यावर मनपाने लक्ष केंद्रित केले आहे. गरजेनुसार संपर्कातील नागरिकांना क्वारंटाइन केले जात आहे.
च्आतापर्यंत २ लाख ९ हजार ६९९ नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यापैकी १ लाख २९ हजार ५७० नागरिकांचे क्वारंटाइन पूर्ण झाले असून सध्या ८०,१२९ नागरिकांचे क्वारंटाइन सुरू आहे.

चाचणीसाठीचा विलंब थांबला : नवी मुंबईमध्ये कोरोना चाचणीसाठी ५ ते १२ दिवस विलंब होत होता. वेळेत अहवाल मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाण व सामाजिक संसर्गाचा धोकाही वाढत होता. सद्य:स्थितीमध्ये अँटिजेन चाचणीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे अर्धा तासात अहवाल मिळत आहे. यामुळे प्रलंबित रिपोर्र्ट संख्या कमी झाली असून वेळेत रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करणे शक्य होऊ लागले आहे.

नवी मुंबईमध्ये १० हजारपेक्षा जास्त रुग्ण बरे करण्यात यश आले आहे. परंतु अद्याप कोरोनाचा धोका संपलेला नाही. जास्तीतजास्त चाचणी करण्यावर व रुग्णांवर वेळेत उपचार करण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. नागरिकांनी आवश्यक त्या नियमांचे पालन करून योग्य खबरदारी घेऊन सहकार्य करणे अपेक्षित आहे.
- अभिजित बांगर,
आयुक्त, महानगरपालिका

Web Title: Ten thousand patients corona free in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.