नवी मुंबई : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारविरोधात मनसेने आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. त्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवी मुंबईमनसेकडून दहा हजार पोस्टकार्ड पाठवली जाणार आहेत. तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आवश्यक सर्व निकषांची पूर्तता झालेली असतानाही केंद्र सरकार टाळाटाळ करत असल्याचाही आरोप मनसेने केला आहे.
तमिळ, तेलगू, कन्नड, ओडीआ तसेच इतर काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यानुसार मराठीलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी महाराष्टÑातून जोर धरत आहे; परंतु त्यासाठी आवश्यक सर्व निकष पूर्ण करूनही मागील साडेचार वर्षांपासून केंद्र सरकार मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे, तर केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या भाषातज्ज्ञांनी एकमताने संमती दर्शवलेली असतानाही केंद्र सरकारकडून तशी घोषणा केली जात नाहीये.
यावरून केंद्र सरकारकडून मराठी भाषेला दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचे दिसून येत आहे. तर या संबंधी पाठपुरावा करण्यासाठी राज्य सरकारही केंद्र सरकारपुढे नमती भूमिका घेत असल्याचाही आरोप काळे यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्टÑातील जनतेच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणारे आंदोलन मनसेतर्फे उभारण्यात आले आहे. त्याकरिता नवी मुंबई मनसेच्या वतीने दहा हजार पोस्टकार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवली जाणार आहेत. या पोस्टकार्ड मोहिमेत संपूर्ण महाराष्टÑातील जनतेने सहभाग घेऊन पोस्टकार्डवर आपल्या भावना लिहून ते पंतप्रधानांना पाठवण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.