जंगलात सापडली दहा वर्षांची मुलगी, पोलिसांनी घेतलं ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 03:23 AM2019-02-20T03:23:45+5:302019-02-20T03:24:01+5:30
आई मारणार म्हणून ही मुलगी आपल्या ठाणे जिल्ह्यातील डोणेवाडी येथील घरातून पळून गेली होती.
नेरळ : कर्जत तालुक्यातील शेलू गावातील जंगलात तेथील पोलीस पाटील मनोज पाटील यांना एक १० वर्षांची मुलगी आज सकाळी सापडली. संबंधित पोलीस पाटील यांनी या मुलीला नेरळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ठाणे जिल्ह्यातील नंदिनी आलोकनाथ चव्हाण ही चौथी इयत्तेत असलेली मुलगी मंगळवारी सकाळी ८ वाजता घरातून निघाली.
आई मारणार म्हणून ही मुलगी आपल्या ठाणे जिल्ह्यातील डोणेवाडी येथील घरातून पळून गेली होती. शेलू गावाच्या जंगलात ही १० वर्षांची मुलगी दिसून आल्याची माहिती शेलू गावचे पोलीस पाटील मनोज यांना मिळाली. त्यानंतर पोलीस पाटील मनोज शेलू गावाच्या जंगलात पोहचले आणि त्यांनी त्या मुलीची माहिती काढून नेरळ पोलीस ठाण्यात दिली. नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी पोलीस शिपाई वैभव बारगजे, प्रशांत मोरे यांना तातडीने तेथे पाठवले.
पोलीस आणि पोलीस पाटील यांनी त्या मुलीला नेरळ पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्या मुलीने आपल्याला आई मारणार होती, म्हणून आपण घरातून पळून निघून गेली असल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी नंतर ठाणे जिल्ह्यातील डोणेवाडी येथून पालकांना बोलावून घेत नंदिनी अलोकनाथ चव्हाण हिला त्यांच्या ताब्यात दिले. जंगलात एकटी फिरत असलेल्या या १० वर्षांच्या मुलीची माहिती तत्काळ मिळाल्याने नेरळ पोलीस ठाण्याने पोलीस मनोज पाटील यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक केले आहे.