दिवाळीसाठी भारतीय बनावटीच्या वस्तुखरेदीकडे कल, कंदील, पणत्या विक्रीसाठी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 12:24 AM2020-10-31T00:24:17+5:302020-10-31T00:25:02+5:30
Diwali News : भारतीय सणांमध्ये सर्वात मोठा सणांपैकी एक असलेल्या दिवाळी सणावरही कोविडचे सावट आहे. अनलॉक सुरू झाल्याने बाजारपेठा सजण्यास सुरुवात झाली आहे.
पनवेल - दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वच सणांवर कोविडचे सावट आहे. यामुळे नागरिकांमध्येही काही प्रमाणात भीती आहे. भारतीय सणांमध्ये सर्वात मोठा सणांपैकी एक असलेल्या दिवाळी सणावरही कोविडचे सावट आहे. अनलॉक सुरू झाल्याने बाजारपेठा सजण्यास सुरुवात झाली आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीचे कंदील, पणत्या बाजारात विक्रीसाठी ठेवलेल्या दिसून येत असून, या वर्षी नागरिकांचा कल भारतीय बनावटीच्या वस्तुखरेदीकडे जास्त असल्याचे दिसून येत आहे.
भारतीय बाजारपेठेवर नेहमीच चीनच्या वस्तुंचा दबदबा असल्याचे पाहावयास मिळत आहे. आकर्षक आणि भारतीय वस्तुंच्या तुलनेत स्वस्त असल्याने, या वस्तुखरेदीसाठी ग्राहकाकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत होते. मात्र, या वर्षी चीनने सीमेवर केलेली कुरघोडी, स्वदेशी वापराबाबत सुरू झालेल्या जनजागृतीमुळे नागरिकांचा कल स्वदेशीकडे दिसत आहे. पनवेलमधील बाजारपेठेत स्वदेशी बनावटीच्या पणत्या, कंदील पाहावयास मिळत आहे. ५० रुपये प्रति डझन ते ३०० रुपयेपर्यंत प्रति डझनपर्यंत पणत्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पनवेलमधील युसुफ मेअर अली सेंटरमध्येही भारतीय बनावटीच्या पणत्या तयार केल्या आहेत. दरवर्षी प्रमाणे मॅजिक लॅम्प नामक या विशिष्ट पणतीची मागणी या वर्षीही कायम असल्याचे या ठिकाणी काम करणारे हस्तकलाकार प्रकाश तांबे यांनी सांगितले.
दिवाळीच्या तोंडावर नवी मुंबईत मॉल पडले ओस
नवी मुंबई : शहरातून कोरोनाचा प्रभाव कमी होत असतानाही नागरिक गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे अद्यापही टाळत आहेत. यामुळे ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला शहरातील मॉल ओस पडल्याचे दिसून येत आहे, तर खरेदीवर वेगवेगळ्या ऑफर देऊनही ग्राहक पाठ फिरवत असल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत. मागील सहा महिन्यांपासून शहरात कोरोनाचा प्रभाव वाढत होता. मात्र, काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे.
यामुळे शहरातील जनजीवन पूर्ववत होत चालले आहे, परंतु मॉल सुरू होऊन एक महिना होत आला, तरीही अद्याप ग्राहकांचा अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. परिणामी, ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येवरही मॉल ओस पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना लुभावण्यासाठी मॉलवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, तर मॉलमधील व्यावसायिकांनी खरेदीवर वेगवेगळ्या ऑफर घोषित केल्या आहेत.
त्यानंतरही मोजकेच ग्राहक मॉलमध्ये पाऊल टाकत आहेत. यामुळे आजवर सतत गजबजलेले दिसणारे मॉल पुन्हा त्याच ओघाने ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु मॉलमधील खाद्यपदार्थांची ठिकाणे व लहान मुलांच्या खेळण्याची ठिकाणे अद्यापही बंदच असल्याने, खरेदीच्या व्यतिरिक्त मॉलला भेट देणाऱ्यांची संख्या घटली आहे. याचा परिणाम व्यवसायावर होत असल्याने मॉलमधील अनेक छोटे-मोठे व्यावसायिक चिंतेत पडले आहेत. अनेकांवर व्यवसाय बंद करण्याचीही वेळ ओढावण्याची शक्यता आहे.