आचारसंहिता संपल्यानंतर महाराष्ट्र भवनासह मेडिकलच्या निविदा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

By नारायण जाधव | Published: May 25, 2024 06:23 PM2024-05-25T18:23:53+5:302024-05-25T18:26:16+5:30

मुख्यमंत्र्यांचे सिडको, महापालिकेला निर्देश : मंदा म्हात्रेंचा पाठपुरावा

Tenders of Medical with Maharashtra Bhavan after code of conduct | आचारसंहिता संपल्यानंतर महाराष्ट्र भवनासह मेडिकलच्या निविदा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

आचारसंहिता संपल्यानंतर महाराष्ट्र भवनासह मेडिकलच्या निविदा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नवी मुंबई: नवी मुंबईत वाशी येथे सिडकोकडून उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनासह बेलापूर येथील नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नियोजित मेडिकल काॅलेज आणि रुग्णालय बांधण्याची निविदाप्रक्रिया लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ४ जून रोजी संपल्यानंतर लगेच सुरू करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी महापालिका आयुक्त आणि सिडकोच्या व्यवस्थापकिय संचालकांना दिले असल्याची माहिती बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकारांना दिली.

या दोन्ही वास्तूंची निविदा प्रक्रिया त्वरित सुरू करावी, या मागणीसाठी म्हात्रे यांनी शनिवारी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या निवेदनावर चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी मोबाइलवर संपर्क साधून हे निर्देश दिले.
 
असे असणार महाराष्ट्र भवन
महाराष्ट्र शासनाकडून नवी मुंबईतील वाशी रेल्वेस्थानकासमोर बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनाची नियोजित इमारत ही १४ माळ्यांची राहणार असून त्यात सर्व सुविधा असणार आहेत. या नियोजित महाराष्ट्र भवनामध्ये व्हीआयपी. रूम तसेच लोकप्रतिनिधी सोबत येणारे त्यांचे वाहनचालक किंवा कर्मचाऱ्यांकरिता ही रूमही असणार आहेत. त्याचबरोबर विविध भागांतून येणाऱ्या विद्यार्थी, अभ्यागतांसाठी विश्रांती कक्ष, ई-लायब्ररी, कॉन्फरन्स हॉल, फूड प्लाझा अशा अनेक विविध प्रकारच्या सर्व सुविधा असणार आहेत. या भवनासाठी २०१४ पासून आमदार म्हात्रेंनी पाठपुरावा केला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये वित्तमंत्री असताना सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १०० कोटींची तरतुदीची घाेेषणाही केली होती.
 
मेडिकल कॉलेजचा खर्च ८१९ कोटी
बेलापूर सेक्टर १५ मध्ये हा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज प्रकल्प हा ८.४० एकरांमध्ये उभारला जाणार असून अंदाजे ८१९.३० कोटी खर्च अपेक्षित आहे. यासाठी सीएसआर निधींचाही प्रयत्न केला जाणार आहे. यासाठीच्या भूखंडाची किंमतही आमदार मंदा म्हात्रे यांनी सिडकोकडून कमी करून घेतली आहे. ५०० खाटांचे हे रुग्णालय राहणार असून तळमजला अधिक ९ मजली असणार आहे. या ठिकाणी कर्करोग, हृदयरोग, मेंदूविकार अशा अनेक मोठमोठ्या आजारांवर उपचार केले जाणार आहेत. शिवाय पीजी/नर्सिंग शैक्षणिक वसतिगृह, पदव्युत्तर शैक्षणिक संकुल, अभियांत्रिकी यार्ड, रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाइकांना राहण्याकरिता धर्मशाळा, नर्सिंग वसतिगृह, अभ्यागत केंद्र, पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृह, वाहनतळ व इतर अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Web Title: Tenders of Medical with Maharashtra Bhavan after code of conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.