नवी मुंबई - बंदमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहारांवरही परिणाम झाला होता. दिवसभरामध्ये १३६४ वाहनांमधून कृषी माल विक्रीसाठी आला होता. फक्त ४६७ वाहनांमधून माल मुंबई व नवी मुंबईमध्ये गेला. यामध्ये भाजीपाल्याच्या ३१६ वाहनांचा समावेश होता. दुपारी मसाला मार्केटमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती; परंतु पोलीस, माथाडी नेते व आरपीआयच्या नेत्यांनी वेळेत सर्वांना शांत केल्याने परिस्थिती नियंत्रणामध्ये आली.बाजार समितीच्या भाजी मार्केटमधील व्यवहार मध्यरात्री सुरू होत असतात. रात्री १ वाजल्यापासून सूर्याेदयापर्यंत भाजीपाल्याच्या ५७७ वाहनांची आवक झाली होती. यामध्ये ९१ ट्रक व ४८६ टेंपोचा समावेश होता. यामधील फक्त ३१६ वाहनांमधून माल मार्केटबाहेर गेला. ६० टक्के भाजीपाला मार्केटमध्येच पडून होता. फळ मार्केटमध्येही २२६ वाहनांची आवक झाली यापैकी ७० वाहनांमधून माल प्रत्यक्ष विक्रीसाठी बाहेर गेला. कांदा मार्केटमध्ये २४१ वाहनांची आवक व ३२ वाहनांची जावक झाली. मसाला मार्केटमध्ये ९० आवक व फक्त ७ वाहनांची जावक झाली. धान्य मार्केटमध्ये २०३ वाहनांमधून माल आला व त्यापैकी १२ वाहनेच जाऊ शकली. शेतकºयांचा माल खराब होऊ नये, यासाठी आंदोलकांनीही भाजी व फळ मार्केटमधील व्यवहार सुरळीत होऊ दिले; पण ग्राहकांनीच पाठ फिरविल्यामुळे मालाची विक्री होऊ शकली नाही.बाजार समितीमधील व्यवहार ठप्प असले, तरी अनेक गोडाऊनची शटर उघडी असल्यामुळे दुपारी आंदोलकांनी मार्केटमध्ये जाऊन बंद करण्याचे आवाहन केले. बाजार समितीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. जमाव हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. पोलीस सहआयुक्त प्रशांत बुरडे, उपआयुक्त सुधाकर पठारे व सहायक आयुक्त प्रदीप जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे व इतर अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. माथाडी नेते आमदार नरेंद्र पाटील, आरपीआय जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहोळ, युवक अध्यक्ष विजय कांबळे व इतर पदाधिकाºयांनी एपीएमसीमध्ये जाऊन सर्वांना शांत केले. बंद मागे घेतल्यानंतरही एपीएमसी परिसरामध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.नेत्यांचे प्रसंगावधानमसाला मार्केटमध्ये तणावाची स्थिती निर्माण होताच माथाडी नेते नरेंद्र पाटील, सी. आर. पाटील, आरपीआय नेते सिद्राम ओहोळ, विजय कांबळे यांनी तत्काळ एपीएमसीमध्ये धाव घेतली. बंद शांततेमध्ये पार पाडण्यासाठी त्यांनी सर्वांना आवाहन केले. सर्वांशी संवाद साधल्यामुळे व प्रसंगावधान दाखवून योग्य निर्णय घेतल्याने काही वेळातच तणाव कमी झाला.
बाजार समितीमध्ये तणावपूर्ण शांतता, कडक पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 6:42 AM