राष्ट्रवादी-सेनेच्या राड्याने शहरात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 11:54 PM2019-03-01T23:54:07+5:302019-03-01T23:54:12+5:30

परस्पर विरोधात तक्रारी दाखल : खुनाच्या प्रयत्नासह विनयभंगाचेही आरोप; ऐरोलीसह कोपरखैरणे बंद

Tension in the city of NCP-Rane | राष्ट्रवादी-सेनेच्या राड्याने शहरात तणाव

राष्ट्रवादी-सेनेच्या राड्याने शहरात तणाव

Next

नवी मुंबई : ऐरोलीत राष्ट्रवादी व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना नगरसेवकांवर खुनाचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सेनेने राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही मारामारी व विनयभंगाचे आरोप केले आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले असून, ऐरोलीसह कोपरखैरणे परिसर बंद केला होता.


नवी मुंबईमध्ये राजकीयदृष्ट्या संवेदनशील परिसर म्हणून ऐरोलीची ओळख आहे. काही वर्षांपासून शांत असलेला हा परिसर शुक्रवारी राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये झालेल्या राड्यामुळे पुन्हा हादरून गेला आहे. सेक्टर ५ मधील महापालिकेने बांधलेल्या मंगलकार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात भिडले. राड्यानंतर दोन्हीकडून एकमेकांविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी यांनी नियोजबद्द कट करून राडा घडवून आणल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. महापालिकेच्या वास्तूचे उद्घाटन करण्यासाठी आमंत्रण असल्यामुळे आम्ही तिथे आलो होतो; परंतु मढवी यांनी मुद्दाम गोंधळ घातला व अपशब्द वापरले. वाद वाढू नये, यासाठी कार्यक्रमातून जाण्याचा प्रयत्न केला असता, रॉड व कैचीने हल्ला करण्यात आला.

अंगरक्षकांनी हल्लेखोरांना अडविले. गाडीत बसल्यानंतर हल्लेखोरांनी कारच्या काचा फोडल्या असून, त्यांच्याविरोधात रीतसर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक केली नाही तर सनदशीर मार्गाने लढा दिला जाईल, असा इशाराही दिला. महापौर जयवंत सुतार यांनीही मढवी यांच्यावर आरोप केले आहेत. गोंधळ होण्याची शक्यता असल्याने बंदोबस्ताची मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकार परिषदेमध्ये माजी खासदार संजीव नाईक, जिल्हाध्यक्ष अनंत सुतार उपस्थित होते.


शिवसेनेनेही पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीवर आरोप केले आहेत. एम. के. मढवी यांनी आमदार संदीप नाईक, अनंत सुतार व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनया मढवी यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला असून, याविषयी लेखी तक्रार केली आहे. वैभव नाईक यांनीही कार्यक्रम स्थळी येऊन शिवीगाळ केली व बंदूक दाखवून मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. खासदार राजन विचारे यांनीही, राष्ट्रवादीने खोटे गुन्हे दाखल केले आहेत, राष्ट्रवादी विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करत आहे. यापूर्वी रुग्णालयासाठी खासदारनिधी देऊनही त्याचा वापर केला नाही. शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागामध्ये वास्तू बांधून झाल्यानंतरही त्यांची उद्घाटने घेतली जात नसल्याचा आरोपही केला आहे. पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, विनया मढवी आदी. उपस्थित होते.

खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांच्या तक्रारीवरून शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी, विनया मढवी, करण मढवी, कुणाल म्हात्रे, अजय म्हात्रे, राजा यादव, अनिल मोरे, ऋषभ उपाध्याय, मढवी यांचा दुसरा चालक व इतरांविरोधात खुनाचा प्रयत्न, मारामारीच्या कलमाखाली गुन्हा दाखल झाला. आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली.

शिवसेनेने केलेली तक्रार
शिवसेनेने राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक, अनंत सुतार व इतर पदाधिकाऱ्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. या सर्वांनी धक्काबुक्की केली व विनया मढवी यांचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप केला आहे. वैभव नाईक यांनी कार्यक्रमस्थळी येऊन शिवीगाळ केली. पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही केला.


काँग्रेसनेही केला निषेध
आमदार व उपमहापौरांसह इतरांना धक्काबुक्की झाल्याचा काँगे्रसनेही निषेध केला आहे. उपमहापौर मंदाकिनी रमाकांत म्हात्रे यांनीही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या संबंधित नगरसेवकांची पार्श्वभूमी सर्वांना माहिती असून त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार, या प्रकरणी कडक कारवाईची मागणीही केली आहे.


दुकाने बंद करण्याचा प्रयत्न
राष्ट्रवादीच्या आमदारांची गाडी फोडल्याचे वृत्त समजल्यानंतर ऐरोली व कोपरखैरणे परिसरातील दुकाने बंद करण्यात आली होती. या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बंद न करण्याचे आवाहन केल्यानंतर दुकाने पुन्हा सुरू करण्यात आली.

दहा वर्षांनंतर पुन्हा राडेबाजी
ऐरोली हा यापूर्वी संवेदनशील विभाग म्हणून ओळखला जात होता. यापूर्वी चार नगरसेवकांचे व अनेक राजकीय पदाधिकाºयांचे खून या परिसरामध्ये झाले आहेत. २००८ पासून या परिसरामधील राडेबाजी कमी झाली होती. नागरिकांनाही दिलासा मिळाला होता. शिवसेना व राष्ट्रवादीमधील राडेबाजीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुन्हा राडेबाजी सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

उद्घाटनांवरून तिसºयांदा राडा
नवी मुंबईमध्ये उद्घाटन व नामफलकांच्या अनावरणावरून यापूर्वीही गोंधळ झाला आहे. ३० एप्रिल २००६ मध्ये सीबीडीमधील राजीव गांधी मैदानाच्या बाजूला असलेल्या सभामंडपाच्या उद्घाटनास तत्कालीन विधानपरिषद सदस्या मंदा म्हात्रे यांना बोलावण्यात आले नाही, यामुळे तत्कालीन मंत्री गणेश नाईक व म्हात्रे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. यानंतर मे २०१४ मध्ये दिवाळे जेट्टीच्या उद्घाटनाचा आमदार मंदा म्हात्रे यांच्या नावाचा फलक काढण्यात आला, यामुळे नाईक व म्हात्रे यांच्यात वाद झाला होता. यानंतर आता पुन्हा ऐरोलीमध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये उद्घाटनाच्या श्रेयावरून वाद झाला असून नवी मुंबईमध्ये पुन्हा श्रेयवादाचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

Web Title: Tension in the city of NCP-Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.