बॅनर फाडल्याने कर्जतमध्ये तणाव
By admin | Published: January 25, 2016 01:25 AM2016-01-25T01:25:36+5:302016-01-25T01:25:36+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कर्जत शहरात शिवसैनिक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फलक लावले होते.
कर्जत : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कर्जत शहरात शिवसैनिक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फलक लावले होते. त्यापैकी काही जाहिरात फलक हे एका जाहिरात एजन्सीच्या बोर्डावर लावण्यात आले होते. ते कंपनीच्या कामगारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी काढून टाकले. जाहिरात फलक फाडून रस्त्यावर फेकल्याने कर्जत तालुक्यातील शिवसैनिक रस्त्यावर उतरले आणि काही काळ कर्जत शहरात तणाव निर्माण झाला.
दरम्यान, या प्रचंड तणावाच्या वातावरणात जाहिरात एजन्सीचे तब्बल १० लोखंडी फलक जमीनदोस्त करण्याचे काम जेसीबी मशिन लावून करण्यात आले, त्याबद्दल कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदराची भावना असताना आज त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना अभिवादन करणारे फलक सर्वत्र झळकत आहेत. त्यातच शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच शिवसैनिक यांच्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी इतर ठिकाणांसह कर्जत शहरातही मोठ्या प्रमाणात फलक लावण्यात आले होते.
कर्जत शहरातील काही मोक्याच्या ठिकाणी जाहिरात फलक लावण्यासाठी कर्जत नगरपालिकेने टेंडर ठाणे येथील श्रुती जाहिरात एजन्सीला दिले आहे. त्या फलकावर काही ठिकाणी शिवसेनेचे जाहिरात फलक लावले होते. लावलेले फलक श्रुती जाहिरात एजन्सीच्या कामगारांनी फाडून टाकले. ठाकरे यांचे बॅनर फाडून टाकल्याची बातमी पसरताच सुमारे ३०० शिवसैनिक कर्जत येथे जमले. बाळासाहेब ठाकरे याचे बॅनर फाडणारा कोण, अशी विचारणा होत शहरातील वातावरण बदलले आणि प्रचंड तणाव निर्माण झाला.
शिवसेनेचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख संतोष भोईर, तालुकाप्रमुख संभाजी जगताप, युवासेनेचे कर्जत तालुका अधिकारी मयूर जोशी, जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती उत्तम कोळंबे, माजी तालुकाप्रमुख बाळाजी विचारे, विरोधी पक्षनेते नितीन सावंत, संतोष पाटील आणि अन्य प्रमुख नेते शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन करीत होते. श्रुती जाहिरात एजन्सीच्या फलकावर बॅनर लावले होते, त्या एजन्सीकडे कर्जत नगर परिषदेने जाहिरात फलकाचे टेंडर तीन वर्षांसाठी दिले आहे. (वार्ताहर)