नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील खड्डे व अर्धवट राहिलेल्या कामांमुळे वाहतूक पोलिसांवरील ताण वाढला आहे. अपघात व त्यामुळे होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी २४ तास राबावे लागत आहे. वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी असणारे पोलीस स्वत:च खड्डे बुजविण्याचे काम करत असल्याचे चित्रही पाहावयास मिळू लागले आहे. वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने सायन- पनवेल महामार्गाचे रुंदीकरण केले; परंतु ठेकेदाराने काम अर्धवट ठेवल्यामुळे व देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग निधी नसल्याचे कारण देत असून, ठेकेदार आम्हाला परवडत नसून हा प्रश्न न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण देत, वाहनधारक व प्रवाशांवर अन्याय करत आहे. खड्डे, रखडलेली कामे यामुळे वारंवार अपघात होऊ लागले आहेत. खड्डे व अपघातामुळे वाहतूककोंडी होत आहे. एक ते दीड किलोमीटर वाहनांच्या रांगा लागत असून, वाहतूक पूर्ववत करताना पोलिसांची तारांबळ होत आहे. नागरिकांच्या रोषालाही पोलिसांनाच सामोरे जावे लागत आहे. वाशी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग दखल घेत नाही. यामुळे बुधवारी पोलिसांनी स्वत:च खड्ड्यंमध्ये पेव्हर ब्लॉक व रेती टाकून ते भरण्याचा प्रयत्न सुरू केला. अपघात व वाहतूककोंडी झाल्यानंतरचा त्रास वाचविण्यासाठी स्वत:च मजुराप्रमाणे पोलीस खड्डे बुजविण्याचे काम करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. तुर्भे उड्डाणपूल, शिरवणे उड्डापुलाच्या बाजूचा रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे. उरण फाट्यावरील उड्डाणपुलाची स्थितीही बिकट झाली आहे. एक महिन्यामध्ये ५०पेक्षा जास्त अपघात झाले आहेत. त्या ठिकाणी जे. एम. म्हात्रे यांच्या माध्यमातून पांढरे पट्टे मारण्याचे काम करून घेण्यात येत आहे. खारघर, कामोठे, कळंबोली परिसरात महामार्गाची स्थिती बिकट झाली आहे. वाहतूक पोलिसांना जादा कर्मचारी तैनात करावे लागत आहेत. कोणत्याही क्षणी वाहतूककोंडी निर्माण होत आहे. यामुळे घरी गेलेल्या कर्मचाऱ्यांनाही पुन्हा कामावर बोलवावे लागत आहे. अनेक पोलीस स्टेशनच्या प्रमुख अधिकाऱ्यांनाही पूर्ण रात्र वाहतूक सुरळीत करण्यासाठी रोडवर उभे राहावे लागत आहे. वाशी, तुर्भे, सीबीडी, खारघर व कळंबोली वाहतूक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार कंपनीला पत्रे दिली आहेत.
खड्डेमय महामार्गाचा वाहतूक पोलिसांवर ताण
By admin | Published: June 29, 2017 3:02 AM