सहा केंद्रांवर आजपासून होणार दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 11:38 PM2020-11-19T23:38:21+5:302020-11-19T23:38:38+5:30

सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना; नवी मुंबईतील १२७८ विद्यार्थी

Tenth and twelth round examinations will be held from today at six centers | सहा केंद्रांवर आजपासून होणार दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा 

सहा केंद्रांवर आजपासून होणार दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा 

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावी-बारावीच्या लेखी फेरपरीक्षा आज २० नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. नवी मुंबई शहरातील सुमारे १२७८ विद्यार्थी या परीक्षांना सामोरे जात असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.


कोरोनाच्या सावटामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी - बारावीच्या फेरपरीक्षा घेण्यास या वर्षी विलंब झाला आहे. शुक्रवारपासून लेखी परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेला शहरातील बारावीचे ८७३ तर दहावीचे ४०५ विद्यार्थी बसले आहेत. बारावीसाठी शहरात तीन तर, दहावीसाठीही तीन परीक्षा केंद्रांवर या परीक्षा पार पडणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक परीक्षा केंद्रावर सॅनिटायझर फवारणी करण्यात आली आहे. परीक्षेला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असून प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान मोजण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करण्याच्या अनुषंगाने एका वर्ग खोलीत केवळ १२ परीक्षार्थी याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.

दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षेची सर्व तयारी झालेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा केंद्रांवर सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एखाद्या विद्यार्थ्याचे तापमान अधिक आढळल्यास संबंधित विद्यार्थ्याशी चर्चा करण्यात येईल आणि परीक्षा देण्यासाठी त्या विद्यार्थ्याची तयारी असल्यास इतर विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून अशा विद्यार्थ्यांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात येईल.
- कृष्णकुमार पाटील, अध्यक्ष, 
मुंबई विभागीय शिक्षण मंडळ
 

Web Title: Tenth and twelth round examinations will be held from today at six centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.