दरोडेखोरांवर मोक्काअंतर्गत कारवाई, तिघांना अटक : तळोजा परिसरामध्ये निर्माण केली होती दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 02:26 AM2018-01-26T02:26:38+5:302018-01-26T02:26:51+5:30
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये दहशत निर्माण करणा-या टोळीतील तिघांना गजाआड करण्यात गुन्हे शाखेने यश मिळविले आहे. या प्रकरणी तिघांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
नवी मुंबई : तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये दहशत निर्माण करणा-या टोळीतील तिघांना गजाआड करण्यात गुन्हे शाखेने यश मिळविले आहे. या प्रकरणी तिघांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
पनवेलजवळील किरवली येथील प्लाझा स्टील गोडाऊनमध्ये नोव्हेंबर २०१७ मध्ये दरोडा पडला होता. ८ जणांनी गोडाऊनमध्ये प्रवेश करून फिर्यादी व इतरांना चाकूचा धाक दाखवून ८५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला होता. गुन्हे शाखेने कौशल्याने या गुन्ह्याचा तपास करून बरकतअली अब्दुल कलाम चौधरी, जियाउद्दीन अच्छनखान, कलाम समशुद्दीन खान या तिघांना अटक केली आहे. या तिघांकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार व रोख रक्कम जप्त केली होती. या आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी स्वतंत्र टोळी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ४ डिसेंबरला रात्री २ वाजता रोहिंजन येथे चोरी करताना हटकले म्हणून चाकूने वार करून पळ काढला. २१ जून २०१७ रोजी नावडा पेट्रोल पंपावर ट्रक चालकास लुटले होते.
अटक केलेले तीन आरोपी व फरार असलेल्या आरोपींनी आयुक्तालय क्षेत्रामध्ये खून,दरोडा, जबरी चोरी, घरफोडीसारखे गंभीर गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.