खोपट्यात भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत; एकाच दिवशी १३ जणांचे लचके तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2023 02:34 PM2023-07-31T14:34:24+5:302023-07-31T14:34:55+5:30
भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याच्या या दहशतीमुळे खोपट्यातील रहिवाशांना घराबाहेर पडताना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मधुकर ठाकूर, उरण : उरण तालुक्यातील खोपटा गावात भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने रविवारी (३०) एकाच दिवशी १३ जणांचे चावा घेऊन लचके तोडले आहेत.चाव्यांनी जखमी झालेल्या इसमांना उपचारासाठी येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याच्या या दहशतीमुळे खोपट्यातील रहिवासी दहशतीखाली वावरत आहेत.
तालुक्यातील खोपटा गावात भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने प्रचंड दहशत माजवली आहे.रविवारी (३०) दिवसभरात एकाच दिवशी नऊ जणांचे चावा घेऊन लचके तोडले आहेत.दामोदर बाळू ठाकुर (८०), चांगुणा प्रभाकर ठाकुर(५५),जयवंती धनंजय ठाकुर(४५),प्रियांका प्रवीण ठाकुर(२४),विघ्नेश प्रांजल पाटील(८),अब्दुल कादिर (३६)आदी सहा जखमींवर येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक कालेल यांनी दिली. उर्वरित सात रुग्णांवर खासगी रुग्णालयात अथवा घरच्या घरी उपचार सुरू असल्याची माहिती सरपंच विशाखा ठाकूर यांनी दिली.जखमीपैकी अब्दुल कादिर हा इसम सेंट्रिंगचे काम करण्यासाठी उरणहून खोपटा गावात आला होता.त्याचेही भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने लचके तोडले आहेत.
भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याच्या या दहशतीमुळे खोपट्यातील रहिवाशांना घराबाहेर पडताना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तसेच कुत्र्याच्या चाव्यामुळे जखमी झालेल्या इसमांनी त्वरित उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.तातडीने उपाययोजना करण्यासाठी सरपंच, ग्रामस्थांनी सोमवारी उरण गटविकास अधिकारी समीर वाठावकर यांची भेट घेऊन चर्चा केली.चर्चेअंती खबरदारीची उपाययोजना म्हणून भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याना पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात येणार असल्याची माहिती उरण गटविकास अधिकारी समीर वाठावकर यांनी दिली.