दहशतवादी हल्ल्याचा शहरवासीयांकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 12:30 AM2019-02-16T00:30:25+5:302019-02-16T00:30:43+5:30

काश्मीर येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शहरात ठिकठिकाणी पाकिस्तान विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला, या वेळी शिवसेना व मनसेच्या वतीने वाशीत पाकिस्तानचा झेंडा जाळून निदर्शने करण्यात आली.

 Terrorist attack city dwellers protest | दहशतवादी हल्ल्याचा शहरवासीयांकडून निषेध

दहशतवादी हल्ल्याचा शहरवासीयांकडून निषेध

Next

नवी मुंबई : काश्मीर येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शहरात ठिकठिकाणी पाकिस्तान विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला, या वेळी शिवसेना व मनसेच्या वतीने वाशीत पाकिस्तानचा झेंडा जाळून निदर्शने करण्यात आली. तसेच शहीद झालेल्या ४४ जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
जम्मू येथून श्रीनगरला जात असलेल्या भारतीय सैन्याच्या ताफ्यात आरडीएक्सने भरलेली गाडी घुसून स्फोट घडवल्याचा प्रकार गुरुवारी संध्याकाळी पुलवामा येथे घडला. दहशतवाद्यांकडून झालेल्या या भ्याड हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले असून, अनेक जण गंभीर जखमी आहेत. हा आत्मघाती स्फोट घडवून आणणारा काश्मिरी तरुण असल्याने त्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप होत आहे. त्यानुसार जैश-ए-मोहम्मद या संघटनेने हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली आहे, त्यामुळे या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शहरात ठिकठिकाणी शहिदांना श्रद्धांजली वाहून पाकिस्तान विरोधात निदर्शने करण्यात आली. वाशीतील शिवाजी महाराज चौक येथे शुक्रवारी सकाळी शिवसेनेतर्फे निदर्शने करण्यात आली. या वेळी शिवसेना मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, प्रकाश पाटील, दिलीप घोडेकर, अतुल कुलकर्णी, विजय माने, नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार, हरिश्चंद्र भोईर, समीर बागवान आदी उपस्थित होते. त्यांनी पाकिस्तान विरोधात निदर्शने करत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रतिमेला चपलांचा हार घातला. तसेच पाकिस्तानचा झेंडा जाळून भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त केला, तर संध्याकाळी मनसेच्या वतीने करण्यात आलेल्या निदर्शनावेळी शहराध्यक्ष गजानन काळे, संदीप गलुगडे, नीलेश बानखिले, विलास घोणे, नितीन खानविलकर आदी उपस्थित होते. त्यांनीही पाकिस्तानचा झेंडा व पुतळा जाळून हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.

कामोठे, कळंबोलीत नोंदवला निषेध
कामोठे, कळंबोलीत दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. गुरुवारी रात्री कामोठे येथे सेक्टर ५ येथील मोकळ्या मैदानात शर्मेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली तरुण एकत्र आले. त्यांनी हातात मेणबत्या घेऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी रामदास लकडे, देवेंद्र गायकवाड, प्रदीप मोहिते, अमर पाटील यांच्यासह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कळंबोली येथील बिमा नाक्यावर शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
- पालिकेच्या स्थायी समिती सभेतही दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. या वेळी सभापती सुरेश कुलकर्णी, आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी शहिदांना श्रद्धांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर अर्थसंकल्पासाठी आयोजित विशेष सभा एक दिवसासाठी तहकूब करण्यात आली.
- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने एपीएमसी येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी एपीएमसीचे सचिव अनिल चव्हाण, अविनाश देशपांडे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शिवनाथ वाघ यांच्यासह इतर सर्वच संघटनांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहत सरकारने या हल्ल्याला सडेतोड प्रत्योत्तर देण्याची भावना व्यक्त केली.

Web Title:  Terrorist attack city dwellers protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.