खारघर हेवन हिल्ससाठी सिडकोकडून चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 11:46 PM2021-01-10T23:46:56+5:302021-01-10T23:47:20+5:30

महत्त्वाकांक्षी प्रकल्प: २५० एकर जागेवर पर्यटनस्थळ

Testing by CIDCO for Kharghar Haven Hills | खारघर हेवन हिल्ससाठी सिडकोकडून चाचपणी

खारघर हेवन हिल्ससाठी सिडकोकडून चाचपणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी मुंबई : खारघर टेकड्यांच्या शांत, निरव आणि निसर्ग संपन्न परिसरात सिडकोने हेवन हिल्स हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित केला आहे. सुमारे २५० एकर जागेवर आकार घेणाऱ्या या पर्यटनस्थळाच्या उभारणीसाठी सिडकोने चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत हा प्रकल्प प्रत्यक्षात येईल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.
खारघर नोड सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे येथील निसर्गरम्य परिसराचा उपयोग करून घेण्यावर सिडकोने भर दिला आहे, खारघरमध्ये यापूर्वीच आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोल्फ कोर्स उभारण्यात आले आहे, अत्याधुनिक सेट्रल पार्कही याच परिसरात आहे. भविष्यात खारघरमध्ये अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहेत. विशेष म्हणजे खारघरच्या निसर्गरम्य जागेवर सुमारे ३५० एकरच्या विस्तीर्ण जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॉर्पोरेट पार्क प्रस्तावित केले आहे. या पार्कमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे फूटबॉल स्टेडियम आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा सिडकोचा मानस आहे. आता यात खारघर हेवन हिल्स प्रकल्पाची भर पडणार आहे. 
मुंबई व नवी मुंबईतील वर्दळीपासून दूर खारघरच्या हिरव्यागार टेकड्यांच्या सानिध्यात हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या परिसरात एक उच्चभ्रू वसाहत विकसीत केली जाणार आहे, तसेच अत्याधुनिक नॅचरोथॅपी केंद्रही असेल. कुटुंबीयांसह काही क्षण शांततेत व्यतित करता यावेत, या दृष्टीने या परिसरात एक रिसॉर्टही विकसित करण्याची सिडकोची योजना आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने प्रकल्पाच्या एकूण २५० एकर जागेपैकी ३९ टक्के क्षेत्र मोकळे ठेवले जाणार आहे. हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय विमानतळापासून केवळ २० मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांसाठी हा हेवन हिल्स प्रकल्प आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरेल, असा विश्वास सिडकोला वाटतो आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले होते. आता सिडकोने त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार, लवकरच प्रकल्प स्थळाचा सर्व्हे करण्यात येणार आहे. त्यानंतर, प्रकल्प आराखडा तयार केला जाईल. एकूणच पुढील काही महिन्यांत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, अशी माहिती सिडकोच्या पणन विभागाचे महाव्यवस्थापक फय्याज खान यांनी दिली.

दळणवळणाच्या प्रगत सुविधा
खारघर हा सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे सिडकोने या नोडवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विशेषत: खारघरमध्ये दळवळणाच्या प्रगत सुविधा निर्माण करण्यावर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी भर दिला आहे. खारघर म्हणजे शहरीकरण आणि निसर्ग याचा परिपूर्ण संगम असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर हेवन हिल्स प्रकल्पाला वेगळे महत्त्व आहे.

Web Title: Testing by CIDCO for Kharghar Haven Hills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.