गृहनिर्मितीसाठी दगडखाणींची चाचपणी; सिडकोचा प्रस्तावित प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 01:17 AM2020-01-03T01:17:25+5:302020-01-03T01:17:33+5:30
एक लाख दहा हजार घरे; या वर्षात होणार पहिल्या टप्प्याचा शुभारंभ
- कमलाकर कांबळे
नवी मुंबई : सिडकोने बजेटमधील घरांच्या निर्मितीवर भर दिला आहे. परिवहन केंद्रित विकास संकल्पनेवर सध्या ९५ हजार घरांच्या उभारणीचे काम सिडकोने हाती घेतले आहे. ही गृहनिर्मिती चार टप्प्यांत केली जाणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील नऊ हजार घरांची अलीकडेच सोडत काढण्यात आली आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच सिडकोने शहरातील दगडखाणी आणि वापराविना पडून असलेल्या मोकळ्या जागेवर आणखी एक लाख दहा हजार घरांचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. नव्या वर्षात या गृहनिर्मितीलाही सुरुवात केली जाईल, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ‘लोकमत’ला दिली.
परिवहन केंद्रित विकास संकल्पनेवर आधारित ९५ हजार घरांच्या निर्मितीसाठी सिडकाने तब्बल १९ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या खर्चाला सिडकोच्या संचालक मंडळाने मंजुरीही दिली आहे. त्यानुसार या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील नऊ हजार घरांची गेल्या नोव्हेंबर महिन्यात संगणकीय सोडत काढण्यात आली. उर्वरित घरे नवी मुंबईतील विविध बस व ट्रक टर्मिनल्स आणि रेल्वे स्थानकांच्या फोर कोर्ट एरियामध्ये बांधली जाणार आहेत. यात तळोजा, खारघर, कळंबोली, नवीन पनवेल येथील बस टर्मिनल्स व वाशी येथील ट्रक टर्मिनल आणि सानपाडा, जुईनगर, खारघर, बामणडोंगरी, खारकोपर, मानसरोवर व खांदेश्वर रेल्वे स्थानकांचा का सामावेश आहे. त्यानुसार आसुडगाव येथील बस डेपो, खांदा कॉलनी आणि खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळील नियोजित बस डेपोच्या जागेवर घरे बांधण्याच्या कामाला सुरुवातही करण्यात आली आहे. हे काम सुरू असतानाच नव्या वर्षात आणखी एक लाख दहा घरे बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या गृहनिर्मितीला राज्य सरकारचीही मंजुरी मिळाली आहे.
ठाणे-बेलापूर औद्योगिक क्षेत्रात सिडकोने प्रकल्पग्रस्तांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ७८ दगडखाणी भाडेतत्त्वावर वितरित केल्या होत्या. तसेच याच क्षेत्रात एमआयडीसीने १५ तर वनविभागाने २७ दगडखाणींचे वाटप केले होते. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी एका सामाजिक कार्यकर्त्याने या दगडखाणींसंदर्भात पुणे येथील हरित लवादाकडे याचिका दाखल केली. त्यामुळे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी गौणखनिज उत्खननाचे परवान्याचे नूतनीकरण करण्यावर बंदी घातली आहे. सिडकोनेही आपल्या आखात्यारित असलेल्या ७८ दगडखाणींचे नूतनीकरण करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे मागील तीन-साडेतीन वर्षांपासून या दगडखाणी बंद पडल्या आहेत. ओस पडलेल्या या दगडखाणीच्या जागेवर आता गृहनिर्मिती करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. गेल्या वर्षी राज्यातील तत्कालीन सरकारने या गृहप्रकल्पला हिरवा कंदील दाखविला आहे. त्यानुसार नव्या वर्षात बंद पडलेल्या दगडखाणींच्या जागेवर एक लाख दहा हजार घरांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.
पहिल्या टप्प्यात तुर्भे परिसरातील दगडखाणींना पसंती
दगडखाणी आणि शहरातील पडीक तथा दुर्लक्षित जागेवर प्रस्तावित एक लाख दहा घरे बांधली जाणार आहेत. नव्या वर्षात या घरांच्या निर्मितीला प्रत्यक्षात सुरुवात केली जाईल. पहिल्या टप्प्यात तुर्भे परिसरातील दगडखाणींच्या जागेवर घरबांधणीला सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने एक लाख दहा हजार घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे सिडकोने निश्चित केले आहे.
परिवहनकेंद्रित विकास संकल्पनेवर अधारित ९५ हजार घरांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आता लवकरच दगडखाणी आणि शहरातील पडीक आणि दुर्लक्षित भूखंडांवर एक लाख दहा हजार घरांच्या निर्मितीला चालना दिली जाणार आहे. चार टप्प्यांत होणाºया या गृहप्रकल्पाचा या वर्षात शुभारंभ करण्याची योजना आहे. एकूणच आगामी काळात सिडकोच्या माध्यमातून तब्बल दोन लाख १५ हजार घरे उपलब्ध होणार आहेत. ही सर्व घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असणार आहेत.
- लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको