नवी मुंबई : शिक्षणापासून वंचित कचरा वेचक महिलांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये घेवून येण्यासाठी घणसोलीतील सावित्री महिला सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. परिसरातील १२ मुलांना पालिकेच्या शाळेत प्रवेश मिळवून दिला असून त्यांना नवीन गणवेश, दप्तर व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. शासन आदेशाप्रमाणे महापालिकेच्यावतीने शाळा बाह्य मुलांचे प्रत्येक वर्षी सर्वेक्षण केले जाते. या मुलांना शाळेत प्रवेश दिला जातो पण त्यामधील अनेकजण काही दिवसामध्ये शाळा सोडून जातात. शैक्षणिक साहित्य, गणवेश व इतर वस्तू नसल्याने प्रवेश मिळाल्यानंतरही गरीब मुलांना शाळेत जाता येत नाही. घणसोली परिसरामध्येही अशी अनेक मुले रस्त्यावर दिवसभर खेळताना व पालकांसोबत प्लास्टीक वेचत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. हातामध्ये पाटी, पेन्सीलऐवजी कचरा पाहून अनेक नागरिक व्यथित होत होते. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये घेवून येण्यासाठी सावित्री महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा ललिता मढवी व नगरसेवक घनशाम मढवी यांनी प्रयत्न सुरू केले. या सर्व मुलांना पालिकेच्या शाळा क्रमांक ४२ मध्ये प्रवेश देण्यात आला. पण पालिकेच्यावतीने यावर्षी गणवेष, दप्तर, वह्या व इतर शैक्षणिक साहित्य देण्यात आले नाही. मुलांना शैक्षणिक साहित्य कोठून द्यायचे असा प्रश्न शिक्षकांना पडला होता. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना माहीती देताच सर्व मुलांना गाडीमध्ये बसवून कपडाच्या दुकानामध्ये नेण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेश व इतर सर्व साहित्य देवून शाळेत पाठविण्यात आले. नवीन कपडे व दप्तर पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसू लागले होते. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये घेवून येण्यासाठी विद्यार्थी व युवक कल्याण समिती सभापती सीमा गायकवाड, परिवहन सदस्य सुरेश म्हात्रे, उत्तम म्हात्रे, सामाजीक कार्यकर्त्या निर्मला रानकर, रेखा म्हात्रे, अरूणा मढवी, जितेंद्र चौधरी, इंदिरा मढवी, मोहन मढवी, नारायण रानकर यांनीही सहकार्य केले. (प्रतिनिधी)
कचरा वेचणाऱ्या मुलांच्या हातात पाठ्यपुस्तक
By admin | Published: January 14, 2017 7:06 AM