मुंबई : ब्रॅण्डेड सौंदर्यप्रसाधने म्हणून विकल्या जाणाऱ्या बनावट सौंदर्यप्रसाधनांचा बाजार मुंबईत खुलेआमपणे सुरू आहे. या धंद्यात कोट्यवधींची उलाढाल होत असून, महिला वर्ग यात फसला जात असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनमधून समोर आणले. यानंतर खडबडून जाग्या झालेल्या मुंबई पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने बनावट सौंदर्यप्रसाधने विक्रेत्यांवर कारवाई करणार असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले आहे. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, वांद्रे लिंकरोड, रानडे रोड-दादर, मालाड आणि मुलुंड यांसारख्या महत्त्वाच्या मार्केटमध्ये खुलेआमपणे बनावट सौंदर्यप्रसाधनांचा धंदा तेजीत सुरू आहे. या धंद्यात पोलीस, कस्टमचे अधिकारीही सहभागी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, या सगळ्याला आळा घालण्यासाठी मुंबई पोलीस सक्रिय होणार आहेत. बनावट अथवा ब्रॅण्डेड सौंदर्यप्रसाधनांच्या कॉपी विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई करते. पण, मोठ्या प्रमाणात महिलांची फसवणूक होत असल्यास बनावट सौंदर्यप्रसाधनांची विक्री होणाऱ्या स्थळांची माहिती घेतली जाईल. त्याचा तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे मुंबई पोलीस (गुन्हे) सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. स्टिंग आॅपरेशनला महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)बनावट ब्युटी प्रोडक्टस्चा मोठा व्यापार मुंबईत सुरू आहे. खऱ्या आणि खोट्या उत्पादनातील किमतींची तफावत पाहून अनेकदा ग्राहक बनावट उत्पादने वापरतात. आम्ही ग्राहकांना आवाहन करत आहोत की, बनावट ब्रॅण्डेड उत्पादनांना भुलू नका. केवळ नोंदणीकृत ब्युटी पार्लर आणि अधिकृत दुकानांतूनच ब्रॅण्डेड ब्युटी उत्पादने खरेदी करा.- तुषार चव्हाण, सरचिटणीस, सलून अॅण्ड ब्युटी पार्लर असोसिएशनकठोर कारवाई व्हावी ब्रॅण्डेड काजळ चक्क ८० आणि १०० रुपयांना मिळते, हे पाहून मीही आकर्षित झाले होते. नंतर असा विचार आला की, इतक्या कमी किमतीत ब्रॅण्डेड काजळ मिळणे अशक्य आहे. ‘लोकमतचे स्टिंग आॅपरेशन’ वाचून आम्हाला या गोष्टीची माहिती मिळाली की, हे काजळ बनावट असून त्याने सौंदर्याला धोका आहे. या अनधिकृत विक्रेत्यांवर कठोर कारवाई व्हावी.- तेजल पाटील, अंधेरीइम्पोर्टेड सौंदर्यप्रसाधने देशात आणताना त्याचा एक नोंदणीक्रमांक असतो. पण, ज्यावर बॅच नंबर नसेल, ती बनावट असतात. एफडीएला बनावट विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास तेथील नमुने गोळा केले जातात. त्यात दोष आढळल्यास चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाते. अशा प्रकारच्या बनावट सौंदर्यप्रसाधनांची खुलेआमपणे विक्री होत असल्यास एफडीए त्यावर कारवाई करेल, असे एका एफडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. विक्रेते बऱ्याचदा रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात अशा स्वरूपाची सौंदर्यप्रसाधने विकत असतात. त्यांच्याकडून उत्पादने घेण्यासाठी जबरदस्ती करतात. मात्र, ‘लोकमत स्टिंग’नंतर हे प्रोडक्टस् विकणाऱ्यांना याबाबत नक्कीच जाब विचारेन. मी तर माझ्या मैत्रिणींनाही असे प्रोडक्ट न घेण्याचा सल्ला दिला आहे. - प्राजक्ता जगताप, विद्यार्थिनी, न्यू लॉ कॉलेज बाजारात विकले जाणारे ब्रॅण्डेड कॉस्मेटिक चोरीचे अथवा कस्टममधून येत असल्याने, ते कमी किमतीत विकले जातात, असा आमचा समज होता. त्यावर विश्वास ठेवून स्वस्तात मिळते म्हणून आम्ही ते विकत घेत होतो. ‘लोकमत स्टिंग आॅपरेशन’नंतर याबाबत नक्कीच विचार करू. त्यामुळे आता नो रिस्क.- श्रावणी मोहिते, गृहिणी, अंधेरीमहिलांनी स्वत:चा विचार करून कमी किमतीत मिळणाऱ्या प्रोडक्टस्वर विश्वास ठेवू नये. मुळात एवढ्या खुलेआमपणे बनावट वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कोणाचाच निर्बंध नाही, ही आश्चर्याचीच बाब आहे. मात्र, यामध्ये ग्राहक महिलाही तितक्याच जबाबदार आहेत. त्यामुळे आपणच आपल्या सौंदर्याची काळजी घेऊन, याला आळा घालण्यासाठी स्वत:पासून सुरुवात करणे गरजेचे आहे. - नेहा कारेकर, तरुणी, गिरगाव
बनावट सौंदर्यप्रसाधन विक्रेते आले रडारवर!
By admin | Published: April 08, 2016 2:07 AM