ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाला चावला उंदीर
By नामदेव मोरे | Published: April 16, 2024 07:26 PM2024-04-16T19:26:12+5:302024-04-16T19:26:33+5:30
इंदिरानगरमधील घटना : उंदीर चावल्यामुळे एक व्यक्तीवर ९ दिवस रुग्णालयात उपचार.
नवी मुंबई : झोपडपट्टी परिसरामध्ये उंदरांची समस्या गंभीर होत चालली आहे. सोमवारी दिवसा इंदिरानगरमध्ये ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखाला उंदीर चावला. याच परिसरामध्ये यापुर्वी एक व्यक्तीला दाेन वेळा उंदीर चावला. त्यांच्या पायाची जखम बळावली असून ९ दिवसांपासून त्यांच्यावर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख महेश कोठीवाले सोमवारी दुपारी इंदिरानगर परिसरात कार्यालयाजवळ उभे होते. अचानक उंदराने त्यांच्या पायाला चावा घेतला. रक्तश्राव सुरू झाल्यामुळे त्यांनी तत्काळ नागरी आरोग्य केंद्रामध्ये धाव घेवून औषधे घेतली. याच परिसरामध्ये एक महिन्यापुर्वी विश्वनाथ शिंदे यांना दोन वेळा उंदीर चावला. त्यांना चार इंजेक्शन घ्यावी लागली आहेत. त्यांना मधुमेहाचा त्रास असल्यामुळे त्यांची जखम बळावली. यामुळे ९ दिवसापुर्वी त्यांना उपचारासाठी महानगरपालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पायाची जखम बळावली होती.
तुर्भे, इंदिरानगर व शहरातील झोपडपट्टी परिसरात उंदीर चावल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. या परिसरामध्ये मुषक नियंत्रणाची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. ज्या परिसरामध्ये जास्त उपद्रव आहे त्या परिसरात विशेष मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
इंदिरानगर परिसरात सोमवारी दुपारी उभा असताना अचानक उंदीराने पायाला चावा घेतला. रक्तश्राव झाल्यामुळे नागरी आरोग्य केंद्रातून इंजेक्शन घेतले आहे.
महेश कोठीवाले, उपशहर प्रमुख ठाकरे गट
एक महिन्यापुर्वी दोन वेळा पायाला उंदीर चावला. चार इंजेक्शन घेतली. पायाची जखम बळावली असल्यामुळे ९ दिवसापासून महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विश्वनाथ शिंदे, नागरीक इंदिरानगर