पनवेल : विधान परिषदेच्या कोकण स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाची निवडणूक सोमवारी पार पडली. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतील एकूण ९४१ मतदारांचा हा प्रभाग आहे. भाजपा रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या भेटीमुळे निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीला मतदान केल्याची चर्चा रंगली होती.राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी प्रथमच आपले पुत्र अनिकेतना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. सेनेचे राजीव साबळे यांचे तटकरेंना कडवे आव्हान आहे. मात्र स्वत:च्या मुलाला निवडणुकीत उतरविले असल्याने तटकरेंसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. पनवेलमध्ये भाजपाचे मतदान पाहता, तटकरे सकाळी १0 वाजल्यापासून पनवेलमध्ये तळ ठोकून होते. उरण, पनवेलचे मतदान येथील प्रांत अधिकारी कार्यालयात पार पडले. पनवेलमध्ये भाजपाचे ६० च्या आसपास मतदान होते. उर्वरित शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे मत देखील राष्ट्रवादीच्या पारड्यात पडल्याने उरण, पनवेलमधून अनिकेत तटकरेंना आघाडी मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या दृष्टीने तटकरेंनी जोरदार फिल्डिंग लावली होती. शेकाप नगरसेवकांना मागील चार दिवसांपासून गोव्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले होते. पनवेलच्या भाजपा नगरसेवकांच्याही संपर्कात तटकरे होते.रायगड जिल्ह्यात शिवसेना १२९ आहे, भाजपा ८६, राष्ट्रवादी ११३, काँग्रेस ४४, शेकाप ९२, अपक्ष ५ संख्याबळ आहे. तटकरेंनी भाजपाला आपल्या पारड्यात उतरवल्याने राष्ट्रवादीचे पारडे अधिक जड झाले आहे. पनवेलमध्ये तटकरे यांनी शेकाप आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेक पाटील, काँग्रेसचे महेंद्र घरत, जे. एम. म्हात्रे, आर. सी. घरत, सुदाम पाटील, सतीश पाटील, प्रीतम म्हात्रे आदींसह भाजपा नगरसेवकांची भेट घेतली.राकॉँपाला पाठिंबा नाहीराष्ट्रवादीला भाजपाचा पाठिंबा नाही. निवडणूक केंद्राबाहेर तटकरे यांची अचानकपणे भेट झाली यापलीकडे भेटीचे दुसरे कोणतेच कारण नाही, अशी प्रतिक्रि या देऊन आमदार प्रशांत ठाकूर यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याच्या वृत्ताला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.राज्यात सेना-भाजपा एकत्र राज्य कारभार चालवत असताना राज्यभरात विविध ठिकाणी एकमेकांविरोधात कुरघोडी करीत असल्याचे पाहावयास मिळत आहेत. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपाने राष्ट्रवादीकडे आपला कल दिल्याचे बोलले जात असल्याने निवडणुकीचे पडसाद राज्यभर विविध ठिकाणी उमटण्याची शक्यता आहे.
तटकरे-ठाकूर यांच्या भेटीने चर्चेला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 1:21 AM